कोल्हापूर : शाखाधिकारी, कॅशिअर निलंबीत, जिल्हा बॅँकेची कारवाई : पोलीसांच्या पातळीवर कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:50 PM2018-06-13T17:50:33+5:302018-06-13T17:50:33+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅँकेने निलंबीत केले. पोलीसांच्या पातळीवर आता कसून चौकशी सुरू झाली आहे.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅँकेने निलंबीत केले. पोलीसांच्या पातळीवर आता कसून चौकशी सुरू झाली आहे.
कसबा बावडा शाखेत २७ सोने तारण कर्ज प्रकरण बनावट सोने ठेवून सुमारे ३२ लाखाचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. बॅँकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा पाटील यांनी चौकशी अंती मंगळवारी शाखाधिकारी संभाजी पाटील, कॅशिअर परशराम नाईक व सोनार सन्मुख ढेरे यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. बॅँकेनेही शाखाधिकारी पाटील व कॅशिअर नाईक यांना निलंबीत केले आहे. शाहूपूरी पोलीसांनी तिघांची कसून चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, बॅँकेने संबधितांवर पोलीसात गुन्हा दाखल केला असला तरी ज्यांच्या हातात बनावट सोने पडले ते कोंडीत सापडले आहेत. पोलीस चौकशीतून सोने परत मिळाले तर ठीक अन्यथा बॅँक पैसे देईल त्यावेळी सोने मिळणार असल्याने ग्राहकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
नाईकवर वरदहस्त कोणाचा?
बॅँकेवर प्रशासक असताना तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कामावर ठेवले जात नव्हते. तरीही कॅशिअर परशराम नाईक तब्बल आठ वर्षे कसबा बावडा शाखेत कसा राहिला. त्यामागे नेमका कोणाचा वरदहास्त आहे, याचीही चर्चा आता बॅँकेत सुरू झाली आहे.
बॅँक प्रशासन खडबडून जागे
कसबा बावडा शाखेतील अपहाराने बॅँकेचे प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले आहे. मुख् य कार्यालयासह सर्वच १९१ शाखांची महिन्याला तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चार्टड आकौंटट (सीए) नेमले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज मागवले असून २२ जून पर्यंत अर्ज करावयाचे आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक असे बारा ‘सीए’चे नेमणूक होण्याची शक्यता आहे.