कोल्हापूर : बालिंगा येथील बोगस प्लॉट खरेदीमध्ये २६ लाखांचा गंडा, दहाजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:16 PM2018-06-11T12:16:44+5:302018-06-11T12:16:44+5:30
बालिंगा (ता. करवीर) येथे बनावट कागदपत्रांद्वारे मूळ मालकाच्या नावावरील रिकाम्या प्लॉटची विक्री करून २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथे बनावट कागदपत्रांद्वारे मूळ मालकाच्या नावावरील रिकाम्या प्लॉटची विक्री करून २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संशयित रामचंद्र पुंडलिक सावरे (३३), त्याचा भाऊ बबन (३६, दोघे रा. गणेशनगर, शिंगणापूर), प्रशांत शेटे (३५, रा. कळंबा), अभिजित अंबादास बागडे (३५), स्वप्निल जगन्नाथ साळोखे (२८), विनोद उर्फ बाळू शिरगावे (३५), रोहन अनिल दाभाडे (२५, सर्व रा. जगतापनगर, पाचगाव), महावीर कापसे नावाची दस्त करून देणारी बनावट व्यक्ती, नसीर महंमद देसाई (४०, रा. नागाव), इनायत महंमद जमादार (३८, रा. यड्राव, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, महावीर बाळासो कापसे यांच्या मालकीचा मौजे बालिंगा येथील गट नं. ८०/१ ब पैकी प्लॉट नं. ५, क्षेत्र २५७.२५ चौ. मी. हा प्लॉट रिकामा आहे. तो संशयित रामचंद्र सावरे याने अन्य साथीदारांच्या मदतीने जून २०१७ मध्ये महावीर कापसे यांच्या नावाचे बनावट मतदान ओळखपत्र तयार करून त्यांचा बालिंगा येथील प्लॉट दुय्यम निबंधक, करवीर क्र. २, कसबा बावडा येथील कार्यालयातून स्वप्निल जगन्नाथ साळोखे याच्या नावावर खरेदी केला.
खरेदीदस्तावेळी इनायत जमादार व नसीन देसाई यांना साक्षीदार म्हणून घेतले. त्यानंतर २ जानेवारी २०१८ रोजी शनिवार पेठ येथील आर. बी. पोवार स्टॅम्प व्हेंडर यांच्या कार्यालयात संचकारपत्र करून २९ जानेवारीला तोच प्लॉट रामचंद्र गुंडाप्पा भोसले (३७, रा. सावर्डे, ता. पन्हाळा) यांना दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्ताद्वारे सुमारे २६ लाख ८४ हजार रुपयांना विक्री केला.
भोसले प्लॉटचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर प्लॉटचे मूळ मालक महावीर कापसे असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी संशयित भामट्यांकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
सावरे व त्याच्या साथीदारांनी अशा प्रकारे अनेकांना प्लॉट खरेदी-विक्रीमध्ये गंडा घातल्याची चर्चा आहे. त्यांना अटक केल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.