भव्य शोभायात्रेने 'अंबाबाई'ची चांदीची मूर्ती 'देवस्थान'कडे सुपूर्द, तीस वर्षांनंतर मूर्तीला देवत्व..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:28 PM2022-03-02T19:28:38+5:302022-03-02T19:29:05+5:30
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने महाशिवरात्रीच्या योगावर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली.शुक्रवारी (दि. ४) अंबाबाई मंदिरात महायज्ञ करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : सप्तरंगी रांगोळ्या-फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोलांचा ताल, हलगी-घुमक्याचा नाद, नेत्रदीपक रोषणाई, एलईडीचा थाट, हिरव्या साड्यांमध्ये नटलेल्या महिला, पारंपरिक वेशभूषा व फेटे घातलेले पुरुष, भक्तिगीते आणि अंबामातेच्या गजरात मंगळवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने महाशिवरात्रीच्या योगावर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली. समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मूर्ती स्वीकारली. शुक्रवारी (दि. ४) अंबाबाई मंदिरात महायज्ञ करण्यात येणार आहे.
सायंकाळी पाच वाजता सराफ संघाच्या कार्यालयाच्या दारात फुलांनी सजविलेल्या वाहनावर अंबाबाईची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली. शाहू छत्रपती व पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक या मान्यवरांच्याहस्ते श्रीफळ फोडून शोभायात्रेची सुरुवात केली. यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार उपस्थित हाेते.
शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी मूर्तीची पूजा केली. महिलांनी लेझीम खेळून, फुगड्या घालून हा आनंदोत्सव साजरा केला. गुजरी, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड या श्री अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणामार्गेच शोभायात्रा अंबाबाई मंदिरात पोहोचली. तेथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे देवीची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.
यावेळी संजय जैन, रवींद्र राठोड, संचालक शिवाजी पाटील, सुहास जाधव, ललित गांधी, महेंद्र ओसवाल, किरण नकाते, प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, प्रसाद कालेकर, किशोर परमार, ईश्वर परमार, राजेश राठोड, के. जी. ओसवाल, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, डॉ. श्वेता गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीस वर्षांनंतर मूर्तीला देवत्व...
अंबाबाईच्या मूळ मूर्तीची अभिषेकामुळे झीज होत असल्याने १९९२ साली कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती बनवली होती. त्यावेळी मतभेदांमुळे ही मूर्ती सराफ संघाकडेच राहिली. यंदा मात्र सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन देवस्थान समितीचे प्रशासक राहुल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांना मूर्ती देवस्थानला देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी या प्रस्तावाला लगेच होकार दिला, अखेर महाशिवरात्रीच्या योगावर मूर्ती अंबाबाई मंदिरात विराजमान झाली.