कोल्हापूर : चालकाच्या चुकीमुळे बस दुर्घटना :चंद्रकांतदादा पाटील, शिवाजी पुलावरील वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 05:30 PM2018-01-27T17:30:37+5:302018-01-27T17:37:02+5:30
शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
कोल्हापूर : शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवाजी पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित असून, नवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. तथापि, या ठिकाणी जुनी लेणी असल्याने पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार २०० मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या नवीन पुलाचे काम रखडले.
या कायद्यात बदल करून हे अंतर २०० मीटरवरून ५० मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजुरीसाठी आहे. ते मंजूर होऊन कायद्यात रूपांतरित होईपर्यंत हा पूल पूर्ण होऊ शकत नाही.
जरी या पुलाचे काम २० टक्के अपूर्ण असले, तरी बराच काळ हा पूल अपूर्ण असल्याने त्याची मजबूती तपासावी लागेल. हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाईल. त्यासाठी या पुलावरून वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा.
शिवाजी पूल जरी १४० वर्षे जुना असला, तरी वेळोवेळी करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हा पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शुक्रवारची घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडलेली आहे. जुन्या पुलावरून वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.