कोल्हापुरात सी. आर. व्यास संगीत महोत्सव, देवकी पंडित यांच्या स्वरांनी चार चाँद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:58 AM2018-12-03T11:58:47+5:302018-12-03T12:03:59+5:30
‘सरस सूर गाउ, मन रिझाउ.... देख चंदा नवीन कस आयो’ या देवकी पंडित यांनी गायिलेल्या बंदिशीने रविवारची शाहू स्मारक भवनातील सायंकाळ संगीत शौकिनांसाठी अविस्मरणीय आनंद देऊन गेली.
कोल्हापूर : ‘सरस सूर गाउ, मन रिझाउ.... देख चंदा नवीन कस आयो’ या देवकी पंडित यांनी गायिलेल्या बंदिशीने रविवारची शाहू स्मारक भवनातील सायंकाळ संगीत शौकिनांसाठी अविस्मरणीय आनंद देऊन गेली.
पंडित यांच्या स्वरांना सहगायिका सुश्मीलता डवाळकर यांनी दिलेली साथ आणि सोबत ठेका धरायला लावणारा ओजस वालिया यांचा तबला, त्याला अश्विन वालावलकर यांचे छेडणारे हार्मोनियमवरील सूर यांनी गुणीदास फौंडेंशनद्वारे आयोजित मैफिलीला चार चाँद लावले.
गुणीदास फौंडेशन, कोल्हापूर व महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबई यांच्यातर्फे रविवारी कोल्हापुरात सी. आर. व्यास संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कोल्हापुरातील गायिका वासंती टेंबे यांनी शास्त्रीय गायिका देवकी पंडित, तबलाबादक ओजस वालिया, हार्र्मोनियमवादक अश्विन वालावलकर व सहगायिका सुश्मीलता डवाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सी. आर. व्यास यांनी रचलेल्या ‘सरस सूर गाउ, मन रिझाउ’ या बंदिशीने मैफलीला सुरुवात झाली. देवकी पंडित यांचा उत्तरोत्तर चढत जाणारा स्वर आणि त्याला तबला व हार्मोनियमची मिळणारी साथ यांमुळे मैफिलीत सुरुवातीपासून रंग भरू लागले.
राग धनकोलीतील ‘सरस सूर गाउ, मन रिझाउ’ या बंदिशीने पहिल्या पाच मिनिटांतच देवकी पंडित यांच्या स्वरांनी संगीत शौकिनांवर मोहिनी टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्या जादूई स्वरांना संगीतशौकिनांनीही टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली.
त्यानंतर ‘देख चंदा नवनी कस आयो’ या बंदिशीने देवकी पंडित आणि सुश्मीलता डवाळकर यांच्या स्वरातील जुगलबंदीने रसिकांची वाहवा मिळविली. शेवटी शेवटी तर तबला आणि सुरांच्या अत्युच्च जुगलबंदीने रसिक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले.