कोल्हापूर : किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करणारा करार रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:31 PM2018-07-02T14:31:15+5:302018-07-02T14:36:06+5:30
वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
कोल्हापूर : वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
‘कोल्हापूर चेंबर’, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कंझ्युमर प्रॉडक्टस् डिस्ट्रीक्ट असोसिएशन, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शने करण्यात आली. यावेळी चेंबरचे पदाधिकारी, सदस्य, उद्योजक, व्यापारी यांनी निदर्शने केली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारच्या परकीय धोरणांना बगल देवून वॉलमार्टने भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भारतातील कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणे, किराणा यासह सर्व क्षेत्रातील किरकोळ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.
बेकारी वाढून भारतीय उत्पादक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे हा करार त्वरीत रद्द करावा, या मागणीसाठी देशभरात निदर्शने होत आहेत. त्याप्रमाणे कोल्हापुरातील व्यापारी, उत्पादक, व्यावसायिकांचा आमचा या करारास तीव्र विरोध आहे. हा करार रद्द करावा. आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, जयेश ओसवाल, दीपक शहा, बबन महाजन, सुशील कोरडे, धैर्यशील पाटील, राहूल नष्टे, नीरज शेटे, संतोष नवलाखा, सुशील कोरडे, आदी उपस्थित होते.
नवी दिल्लीत २३ जुलैला राष्ट्रीय अधिवेशन
नवी दिल्लीमध्ये दि. २३ जुलैला कॉन्फडेरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर होणाºया प्रतिकूल परिणामाची माहिती सरकारला देणार आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.