कोल्हापूर : संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:45 AM2018-03-28T11:45:49+5:302018-03-28T11:45:49+5:30
परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहमालकांना ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आहे.
कोल्हापूर : परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहमालकांना ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आहे.
संगम चित्रपटगृहाचे मालक सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता चित्रपटगृहाचे बांधकाम पाडल्याबद्दल भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश पोवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि. २८ नोव्हेंबर २०१६ ला संबंधित मालकांकडून खुलाशाची मागणी केली होती. त्यावर त्यांनी चित्रपटगृह चालविणे अशक्य असल्याने दि. १ एप्रिल २०१५पासून खेळ व व्यवसाय बंद केल्याचे कळविले.
सध्या इमारतीची देखभाल होत नाही. त्याचबरोबर काही महिन्यांपासून ही इमारत धोकादायक स्थितीत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी झाली आहे. अशातच बेकायदेशीर व अनैतिक कृत्ये या ठिकाणी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
या जागी पुन्हा नव्याने काही करायचे झाल्यास कायद्याच्या सर्व बाबींची पूर्तता करून सर्व आवश्यक परवानग्या रितसर घेतल्या जातील, असे या खुलाशाद्वारे मालक बुदिहाळकर-पाटील यांनी कळविले होते.
यावर वस्तुस्थिती पाहता महाराष्ट्र चित्रपटगृहे नियम १९६६ मधील तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेल्या परवानगींच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे तसेच इमारत पाडून ही जागा इतर व्यक्तीस हस्तांतर केल्यामुळे मुंबई सिनेमा (विनिमय) अधिनियम १९५३ च्या ‘कलम ७’मधील तरतुदीनुसार चित्रपटगृह मालक बुदिहाळकर-पाटील यांना ५००० रुपये दंडाची कारवाई अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
कार्यालयाच्या परवानगीशिवाय मालकांनी त्याचा पुनर्विकास करू नये, असे आदेश दिले आहेत. याबाबतची नोंद प्रॉपर्टीकार्डच्या ‘इतर हक्कांत’ करण्याचे आदेशही नगर भूमापन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
यासंदर्भातील आदेश आपल्याला मिळाले आहेत. आपल्याला व्यवसाय परवडत नसल्याने आपण सन २००१ मध्येच हे चित्रपटगृह बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितली होती. त्यानंतर काही काळ पत्रव्यवहार व सुनावणी झाली; परंतु १२ वर्षांत काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ही इमारत धोकादायक झाल्याने ती पाडली तसेच रिकाम्या जागेची कायदेशीररीत्या विक्री केली आहे, तरीही माझ्याकडून काही चूक झाले असे वाटत असल्यास आदेशाप्रमाणे दंड भरणार आहे. त्यावर आपला काहीच हरकत नाही.
- सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर