कोल्हापूर :मतदार यादीत दोन्हीकडे नाव ठेवल्यास गुन्हा दाखल: विभागीय आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:39 PM2018-09-27T16:39:49+5:302018-09-27T16:44:36+5:30
मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे ठेवणाऱ्या मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कुणावरही अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही; परंतु यापुढे ती केली जाईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी येथे दिला.
कोल्हापूर : मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे ठेवणाऱ्या मतदारांवर गुन्हा दाखल केला जाईल. अद्याप कुणावरही अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही; परंतु यापुढे ती केली जाईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात मतदार याद्यांसदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महपालिका शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरचिटणीस अनिल साळोखे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप मैत्राणी, कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, ‘मनसे’चे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, आदी प्रमुख उपस्थित होते.
विजय करजगार यांनी, काही व्यापाऱ्यांची नावे दोन्हीकडे असून ते दोन्हीकडे मतदान करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर डॉ. म्हैसेकर यांनी मतदार यादीत दोन्हीकडे नावे ठेवणे हा गुन्हा असून, संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला.
सचिन चव्हाण यांनी कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण मतदार संघांतील नावे मोठ्या संख्येने वगळल्याने संशय निर्माण झाल्याचे सांगून, परस्पर काही लोकांची नावे इतरत्र स्थलांतरित केल्याचे सांगितले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे ही माहिती घेतली, अशी विचारणा केली.
यावर करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी २०१६ च्या मतदार यादी कार्यक्रमानुसार खात्री करूनच ही नावे वगळण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांना कल्पना देण्यात आली असून, ही यादी महापालिका, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयांमध्ये लावण्यात आलेली आहे. तरीही शंका असल्यास अशी नावे निदर्शनास आणून द्यावीत, बीएलओ जागेवर जाऊन त्यांचे फॉर्म पुन्हा भरून घेतील.
डॉ. म्हैसेकर यांनी वगळण्यात आलेल्या मतदारांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठवून त्यांना याबाबत कळवावे, अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या. शारंगधर देशमुख यांनी बीएलओ काही ठिकाणी जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर डॉ. म्हैसेकर यांनी बीएलओंची बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्या माध्यमातून आढावा घेतला जाईल व कामचुकार बीएलओंवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, अजित फराकटे, आदी उपस्थित होते.
नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करावी
मतदार यादीचा आढावा घेता, अजूनही काही कालावधी शिल्लक असून, या काळात निवडणूक विभागाने जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करावी, यामध्ये राजकीय पक्षांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
राजकीय पक्षांनी मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावा
मतदार यादी कार्यक्रमांतर्गत सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावा; जेणेकरून निवडणूक विभागाच्या कामकाजाबाबत त्यांना योग्य ती माहिती मिळेल, असे आवाहन स्नेहल भोसले यांनी केले.