कोल्हापूर : रंकाळा उद्यानात झाडांचा केक कापून वाढदिवस, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमींची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:49 PM2018-10-01T12:49:39+5:302018-10-01T12:51:43+5:30
वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात रंकाळाप्रेमी, वृक्षपे्रमी यांच्यासह नागरिकांच्या साक्षीने झाडांचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला.
कोल्हापूर : ‘वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात रंकाळाप्रेमी, वृक्षपे्रमी यांच्यासह नागरिकांच्या साक्षीने झाडांचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात झाल्यावर सर्व वृक्षप्रेमींचे स्वागत, झाडांची विधीवत पूजा, मान्यवरांच्या हस्ते सर्व वृक्षांना सेंद्रिय खत, ताक, गोमूत्र व पाणी घालण्यात आले. यावेळी उपमहापौर महेश सावंत यांच्या हस्ते केक कापून टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात ‘वृक्षांचा वाढदिवस’ साजरा करण्यात आला.
दिनकर कमळकर यांनी प्रास्ताविक केले. महेश सावंत म्हणाले, रंकाळा उद्यानात पाण्याची टाकी, बेंच, ओपन जिम, मुलांची खेळणी आदींची व्यवस्था तातडीने करून देऊ. रंकाळा परिघातील सर्व उद्यानांमध्ये २०० झाडे लावल्याबद्दल राजेश कोगनूळकर व परिवाराचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोगनूळकर म्हणाले, रंकाळा परिसर म्हणजे अनेक नागरिकांना मोफत आॅक्सिजन पुरविणारे हृदय आहे; पण रंकाळ्यात होणाऱ्या प्रदूषणामुळे त्याला उतरती कळा लागलेली आहे. प्रा. मोहन मतकर यांनी, झाडांचा पहिला वाढदिवस हा आपण व आपला नातू अशा दोघांनीच साजरा केला होता; पण चार वर्षांत त्याला लोकसोहळ्याचे रूप आलेले बघून आपण भारावून गेलो आहोत, असे सांगितले.
सर्व झाडांचे संगोपन करणाºया चैतन्य योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांचा वटवृक्षांची प्रतिमा देऊन यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी मेजर महादेव सन्मुख, विनोद परमेकर, राजू माने यांच्या बगीचातील उल्लेखनीय कामांबद्दल तसेच शिवाजी पाटील, हेमंत लोखंडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, प्रा. मोहन मतकर व सावली ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक शिवाजीराव पटवणे यांच्या गीतगायनाने झाली. या कामी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे सहकार्य लाभले. यावेळी दिग्दर्शक यशवंत भालकर, अनिल देशपांडे, अशोकराव चौगले, रामराव दळवी, भगवानराव पोवार, अरविंद पाटील, डी. बी. पाटील, उद्धव जाधव व ए. के. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. डी. बी. पाटील यांनी आभार मानले.
झाड वाढदिवस
कोल्हापुरात रविवारी जुना वाशी नाका येथील रंकाळा उद्यानात निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी यांच्यातर्फे झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी केक कापून झाडांचा वाढदिवस केला.