कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा होणार विस्तार, डेपो ताराबाई पार्कात हलवणार

By पोपट केशव पवार | Published: June 19, 2024 12:04 PM2024-06-19T12:04:59+5:302024-06-19T12:05:21+5:30

परवानगीची प्रतीक्षा : प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देता येणार

Kolhapur central bus stand will be expanded, depot will be shifted to Tarabai Park | कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा होणार विस्तार, डेपो ताराबाई पार्कात हलवणार

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा होणार विस्तार, डेपो ताराबाई पार्कात हलवणार

पोपट पवार

कोल्हापूर : एस.टी.महामंडळाची ताराबाई पार्कातील कार्यशाळा गोकूळ शिरगाव येथे स्थानांतरित केल्यानंतर आता या जागेवर कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील गाड्या देखभाल, दुरुस्तीचा डेपो स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी विभागीय कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठविला असून, त्याला मंजुरी मिळताच ही स्थानांतराची प्रक्रिया केली जाणार आहे.

येथील डेपो हलविल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकातील या जागेचा बसस्थानक म्हणून वापर होऊ शकतो. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणात जागा वापरात येऊन प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत.

एस.टी. महामंडळाच्या ताराबाई पार्कातील ७ एकर जागेत एस.टी.ची कार्यशाळा होती. गेल्या ६१ वर्षांपासून सुरू असणारी ही कार्यशाळा नुकतीच गोकूळ शिरगाव येथे स्थानांतरित करण्यात आली. त्यामुळे या जागेवर मध्यवर्ती बसस्थानकातील बसेसचा डेपो हलविण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. हा डेपो ताराबाई पार्कात हलवल्यास रिक्त जागा बसस्थानक म्हणून वापरात आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक हे सतत प्रवाशांच्या वर्दळीने भरलेले बसस्थानक म्हणून ओळखले जाते. येथे राज्यभरातील रोज १२२५ बसेसची ये-जा सुरू असते. यातून जवळपास ५० हजार प्रवासी या बसस्थानकावरून प्रवास करतात. शिवाय कर्नाटकातही जाण्यासाठी प्रवाशांचा मोठा ओढा असतो. बसेसची संख्या, प्रवाशांची गर्दी यांच्या तुलनेत ही जागा अपुरी पडते. अनेकदा फलाटावर गाडी लावण्यासाठीही जागा नसल्याने काही बसेस बसस्थानकाच्या आवारात दुसऱ्या ठिकाणी उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे या बसस्थानकाचा विस्तार करण्याची गरज होती. त्यामुळे येथील गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा डेपो ताराबाई पार्कात हलविल्यास ही जागा बसस्थानकासाठी वापरात आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

डेपोत होते गाड्यांची देखभाल

मध्यवर्ती बसस्थानकातील डेपोत रुटवरील गाड्यांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. गाड्यांची हवा, ऑइल याची रोज तपासणी होते. काही किरकोळ बिघाड असेल तर याची येथेच दुरुस्ती केली जाते. मध्यवर्ती बसस्थानकात डेपोची मोठी विस्तारित जागा आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातील गाड्यांच्या फेऱ्या : १२२५, रोजचे प्रवासी : ५० हजार

एस.टी.महामंडळाची ताराबाई पार्कातील कार्यशाळा गोकूळ शिरगाव येथे स्थानांतरित केली असून, या जागेवर मध्यवर्ती बसस्थानकातील डेपो स्थानांतरित करण्याचा विचार आहे. मात्र, याला अजून वरिष्ठ कार्यालयाची परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळताच डेपोचे स्थानांतरण करण्यात येईल. या डेपोच्या जागेचा बसस्थानकासाठीही वापर करता येऊ शकतो. -अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभाग.

Web Title: Kolhapur central bus stand will be expanded, depot will be shifted to Tarabai Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.