कोल्हापूर :शहरासह उपनगरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:12 PM2018-06-04T13:12:35+5:302018-06-04T13:12:35+5:30
‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरकेनगर, इंगळेनगर, फुलेवाडी रिंगरोड या तिन्ही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन लंपास केले. चोरट्यांनी पोलीसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
कोल्हापूर : ‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरकेनगर, इंगळेनगर, फुलेवाडी रिंगरोड या तिन्ही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन लंपास केले. चोरट्यांनी पोलीसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
रस्ता निर्जन असो अथवा वर्दळीचा, महिला एकटी असो वा दुकटी; जर महिलेच्या अंगावर दागिने असतील, तर ती महिला घरी दागिन्यांसह सुखरूप पोहोचेल, याची आता शाश्वती नाही. कारण हिसडा मारून ‘धूम स्टाईल’ने दागिने लंपास करणाऱ्यांपुढे पोलिसांनीही हात टेकले आहेत.
आर. के. नगर येथील हेमलता संयज टेंबुर्ले यांचे बंगल्यासमोर अलका शिवानंद उत्तूरे या महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, श्री कृष्ण रेसीडेन्सी इंगळे नगर येथील सुुलक्षणा सुभाष सुखी यांचे तीन तोळ्यांचे गंठण, फुलेवाडी रिंगरोडवर अयोध्या कॉलनी येथे के.एम.टी. बसमध्ये चढताना शीला गजानन निकम यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले. अवघ्या तासाभरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंग झालेने पोलीस चक्रावून गेले.
सदरबजारापर्यंत माग
फुलेवाडी, इंगळेनगर आणि आर. के. नगर येथील चेन स्नॅचरांचा पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला असता ते सदरबजारपर्यंत गेलेचे दिसून आले. चोरट्यांचे चेहरे निष्पन्न झाले असून त्यांना लवकरचं अटक केली जाईल, असे करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.
असे होते चेन स्नॅचिंग
तोंडाला माकडटोप्या घालून किंवा रूमाल, हेल्मेट बांधून चोरटे काळ्या रंगाच्या पल्सर किंवा स्प्लेंडर गाडीवरून शहरात कुठे संधी मिळते, याची चाचपणी करत असतात. एकटी महिला दिसताच तिच्या जवळून जाऊन अंगावरील दागिन्यांचे निरीक्षण करून ते पुढे निघून जातात. त्यानंतर पुन्हा तीन ते चारवेळा तिच्याजवळून फेऱ्या मारतात.
महिला विचारात किंवा बोलण्यात गुंग असताना आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून, पाळत ठेवून दुचाकीवरून भरधाव येऊन तिच्या गळ्यातील मौल्यवान दागिना हिसकावून ‘धूम स्टाईल’ने ते पलायन करतात. त्यासाठी ते विनानंबरप्लेट दुचाकी तसेच चोरीच्या गाडीचा वापर करतात.
कायद्याची अंमलबजावणी व्हावी
महिलांच्या कानातील सोन्याची कर्णफुले किंवा गंठण हिसडा मारून काढून घेताना त्यांचे कानही फाटले आहेत तर काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. चोरट्यांच्या शिकार झालेल्या बहुतांश महिला या मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यामुळे अशा गुन्हयातील चेन स्नॅचरना जरब बसविण्यासाठी किमान दोन ते पाच वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.