कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बदलणार नाही : चंद्रकांत पाटील यांनी टाकला चर्चेवर पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:21 PM2018-06-29T15:21:10+5:302018-06-29T15:22:27+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला.
प्रेस क्लबच्या कार्यक्रमावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मुळात लोकशाहीमध्ये अशा पध्दतीने दरवर्षी पदाधिकारी बदलणे योग्य नाही. मात्र आमच्याबरोबरच जे घटक पक्ष आहेत त्यांना त्यांचे पदाधिकारी बदलण्यासाठी मुभा दिली आहे. परंतू अध्यक्ष भाजपचा आहे. आम्ही अडीच वर्षे त्यात बदल करणार नाही.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्यावतीने अनेक प्रभावी नेत्यांना पक्षात समाविष्ट करून घेतले होते. त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते अरुण इंगवले यांचाही समावेश आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंगवले यांना त्यावेळी अध्यक्ष करण्याचा ‘शब्द’ दिला होता.
मात्र, निवडणूक निकालानंतर सत्तास्थापन करण्यासाठी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी सव्वा वर्षांचा कालावधी ठरविण्यात आला. त्यावर एकमत होऊन जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची सत्ता आली.
अध्यक्षपदाला दीड वर्षांचा कालावधी लोटला असल्याने अध्यक्ष बदलाच्या कारणावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शौमिका महाडिक यांच्या राजीनाम्याबाबत महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी राजीनामा देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री पाटील व भाजप सदस्य आणि मित्रपक्ष यांच्याशी चर्चा करून इंगवले यांना अध्यक्षपदी संधी देण्यात येणार असल्याचे शेळके यांनी सांगितले होते.