कोल्हापूर : ‘चंदगड भवन’वरून सदस्य, सीईओंचा आवाज वाढला, शौमिका महाडिक यांनी अखेर दिला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:58 PM2018-10-20T14:58:16+5:302018-10-20T14:59:37+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध्यस्थी करीत हे भवन बांधण्याबाबतच्या ठरावाची प्रत संंबंधितांना दिली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध्यस्थी करीत हे भवन बांधण्याबाबतच्या ठरावाची प्रत संंबंधितांना दिली.
गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘चंदगड भवन’ बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लाप्पा भोगण आणि सदस्या विद्या पाटील यांचे पती विलास पाटील यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. या दोघांनाही ही बाब समजल्यानंतर त्यांनी शुक्रवारी अध्यक्षा महाडिक यांची भेट घेतली.
यानंतर मित्तल यांनाही निरोप देण्यात आला. ते अध्यक्षांच्या दालनामध्ये आल्यानंतर भोगण आणि पाटील यांनी त्यांना ‘तुम्ही नकारात्मक भूमिका का घेता?’ अशी विचारणा केली. ‘सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर केल्यानंतरही तुम्ही अशी भूमिका का घेतली? आम्ही स्वनिधीतील पैसे देत असताना तुमचा आक्षेप का,’ अशी विचारणा या दोघांनी केली. याला मात्र मित्तल यांनी आक्षेप घेतल्याचे समजले. हा निधी जिल्हा परिषदेचा आहे, अध्यक्षांचा आहे, असे त्यांनी सांगितले. जरी सभेने ठराव केला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझी आहे, असे मित्तल म्हणाले.
यावेळी विलास पाटील यांनी आवाज वाढविल्यानंतर मित्तल यांनीही संताप व्यक्त केला. हा शासनाचा पैसा आहे. कुठेतरी दोन खोल्या बांधून आपण काहीतरी करणार असू तर ते करून चालणार नाही. मला विचारणारे कुणीतरी आहे, अशा स्पष्ट शब्दांत मित्तल यांनी आपली भूमिका मांडली.
अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी या वादात मध्यस्थी केली. हे भवन व्हायला हवे आणि ते जिल्हा परिषदेची प्रक्रिया पूर्ण करून व्हावे आणि भविष्यातही त्याचा उपयोग व्हावा, अशा पद्धतीने हे काम करून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्वसाधारण सभेतील ठरावाची प्रतही यावेळी भोगण यांच्याकडे देण्यात आली.
पाच मजली इमारतीसाठी डिझाईन करा
यावेळी अमन मित्तल यांनी ही इमारत पाच मजली होईल, अशा पद्धतीने त्याचा पाया काढून तसे डिझाईन करण्याची सूचना केली. माझा ‘चंदगड भवन’ला विरोध नाही. मात्र मोक्याची कोट्यवधी रुपयांची जिल्हा परिषदेची जागा देताना त्या जागेवर आणखी मजले वाढविता यावेत असेच हे बांधकाम हवे. सदस्यांना चांगल्या दर्जाच्या खोल्या निवासासाठी मिळाव्यात, अशी आपली भूमिका असल्याचे यावेळी मित्तल यांनी सांगितल्याचे समजते.