कोल्हापूर : नव्या अवजड वाहनांची फिटनेस तपासणीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:51 AM2018-11-15T10:51:15+5:302018-11-15T10:53:33+5:30
ट्रक, कंटेनर, टेम्पो, बस अथवा खासगी आराम बस नव्याने खरेदी केल्यानंतर आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस तपासणी केली जाणार आहे. यासह राष्ट्रीय परमीटसाठी दोन चालकांची अटही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.
कोल्हापूर : ट्रक, कंटेनर, टेम्पो, बस अथवा खासगी आराम बस नव्याने खरेदी केल्यानंतर आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस तपासणी केली जाणार आहे. यासह राष्ट्रीय परमीटसाठी दोन चालकांची अटही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.
देशाच्या एका टोकापासून हजारो मैलांचा प्रवास करीत धावणारी अवजड वाहने तंदुरुस्त असावीत; यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने फिटनेसच्या बाबतीत नवीन नियम व अटी तयार केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यात नवीन अवजड वाहने यात प्रवासी व मालवाहतूक अशा वाहनांना आठ वर्षांपर्यंत प्रत्येक दोन वर्षांनी त्याची तंदुरुस्ती चाचणी केली जाणार आहे.
प्रत्येक वर्षी अशा वाहनधारकांना किमान दोन दिवसांचा वेळ काढून वाहनांची तपासणी करावी लागत होती. यात श्रम, पैसा , वेळ लागत होता; त्यामुळे आता नव्या नियमाप्रमाणे हा वेळ व पैसा वाचणार आहे. यासह फुल्ली बिल्टअप अवजड वाहनेही कंपन्या तयार करून देऊ लागली आहेत, अशा वाहनांची तपासणी अशाच पद्धतीने होणार आहे.
राष्ट्रीय परमीट असलेल्या वाहनांवर प्रत्येकी दोन चालक असावेत, अशी अट होती. त्यात दुरुस्ती करून एकच चालक ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे; त्यामुळे काही प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
ट्रॅव्हलर्सच्या मनमानीला चाप
दीपावलीच्या सुट्टीत चाकरमानी लोक आपआपल्या गावी जातात. यात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत ट्रॅव्हलर्स चालक मनमानी भाडे आकारतात. ही आराम बस चालकांची मनमानी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोडीत काढली.
या दरम्यान सलग दोन दिवस कारवाईचा बडगा उगारला. त्यात पाच ट्रॅव्हलर्सना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून योग्य खुलासा न आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी स्पष्ट केले.