कोल्हापूर : भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची बदली : लाचप्रकरणाची कारवाई बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:59 AM2018-08-04T11:59:55+5:302018-08-04T12:10:31+5:30
कोल्हापूर येथील ‘भारत राखीव बटालियन ३’चे प्रमुख समादेशक खुशल व्ही. सपकाळे यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासंबंधीचा आदेश शासनाने शुक्रवारी काढला. चाळीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये सपकाळे यांचे नाव पुढे आले आहे.
कोल्हापूर : येथील ‘भारत राखीव बटालियन ३’चे प्रमुख समादेशक खुशल व्ही. सपकाळे यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासंबंधीचा आदेश शासनाने शुक्रवारी काढला. चाळीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये सपकाळे यांचे नाव पुढे आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोनवेळा नोटीस पाठवूनही ते हजर राहिले नाही. त्यांची चौकशी सुरू असताना अचानक बदली झाल्याने लाचप्रकरणात त्यांचे नाव वगळून कारवाईचा टप्पा पूर्ण केल्याची चर्चा रंगली आहे.
आपल्याच कार्यालयातील जवानांकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या सहायक समादेशकासह सहा संशयितांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी संशयित पोलीस निरीक्षक मधुकर श्रीपती सकट, लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव, सहायक फौजदार रमेश भरमू शिरगुप्पे, आनंदा महादेव पाटील, पोलीस शिपाई प्रवीण प्रधान कोळी यांना अटक झाली.
शासनाने या सर्वांना खात्यातून निलंबित केले. सहायक समादेशक मनोहर नारायण गवळी याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. बटालियनचे प्रमुख समादेशक सपकाळे यांचे नाव लाचेच्या मागणीमध्ये पुढे आले आहे. त्यांच्याशी तक्रारदाराचे पैसे दिल्यासंबंधीचे बोलणे झाल्याचे कॉल रेकॉर्डही पथकाच्या ताब्यात आहे.
त्यांच्या कॉलचे सात सीडीआर उपलब्ध झाले आहेत. नेमके काय बोलणे झाले, त्याचे रेकॉर्ड झाले असून पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मोबाईल संभाषण झालेले नंबर कोणाचे आहेत, याची माहिती पथक घेत असल्याचे तपास अधिकारी गिरीश गोडे यांनी सांगितले.
नोटीस पाठवूनही हजर नाही
सहायक फौजदार आनंद पाटील याने समादेशक सपकाळे यांना फोन करून तक्रारदार शेंडगे यांच्याशी बोलणे करून दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे २७ हजार रुपये सपकाळे यांच्या खासगी एजंटाच्या बँक खात्यावर भरण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी याच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
सपकाळे यांची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले होते. कारवाई १७ जुलैला झाली. सपकाळे यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोनवेळा नोटीस पाठवूनही ते हजर राहिले नाही. लाचलुचपत विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून त्यांची प्रतीक्षा करीत असतानाच सपकाळे यांची नांदेडला बदली झाली; त्यामुळे हे प्रकरण दडपल्याची चर्चा आहे.