कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार, सळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 07:17 PM2018-04-17T19:17:15+5:302018-04-17T19:17:15+5:30
भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवून पारतंत्र्याविरोधात कसं लढायचं असतं, याचे जितेजागते उदाहरण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती कोल्हापूर शहरामध्ये अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, शिवशाहिरांचे खडे बोल, जोडीला मर्दानी खेळ आणि अखंड चाललेला शिवघोष असे भारदस्त आणि मराठमोळे वातावरण मंगळवारी कोल्हापूरने अनुभवले. रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीचाच जल्लोष पाहावयास मिळाला.
कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवून पारतंत्र्याविरोधात कसं लढायचं असतं, याचे जितेजागते उदाहरण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती कोल्हापूर शहरामध्ये अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली.
फडफडणारे भगवे ध्वज, लहरणाऱ्या भगव्या पताका, शिवशाहिरांचे खडे बोल, जोडीला मर्दानी खेळ आणि अखंड चाललेला शिवघोष असे भारदस्त आणि मराठमोळे वातावरण मंगळवारी कोल्हापूरने अनुभवले. रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीचाच जल्लोष पाहावयास मिळाला.
शहरातील चौकाचौकांत मंडप उभारून शिवप्रभूंच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा असणारे फलक सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मर्दानी खेळ, व्याख्याने, प्रतिमापूजन, पाळणा अशा विविध माध्यमांतून सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग जाणवत होती. शिवज्योती घेऊन आलेले शिवभक्त अनेक ठिकाणी स्वागत स्वीकारत होते. भगवे फेटे बांधलेल्या आणि कपाळावर अष्टगंध लावलेल्या युवकांमुळे पेठापेठांतून शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाने सकाळी शिवजन्मकाळ साजरा केला. याचवेळी संयुक्त जुना बुधवार पेठेनेही शिवजन्मकाळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘संयुक्त राजारामपुरी’तर्फे पहाटे शिवज्योत आणून त्यानंतर शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. विविध संस्था, तरुण मंडळांच्या वतीने जागोजागी शिवपुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन करण्यात आले होते.
सायंकाळी पाचनंतर शहराच्या विविध भागांतून शिवपुतळ्यासह आणि शिवप्रतिमांसह जंगी मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांचा गजर, हलगी-घुमक्याचा कडकडाट, लेसर शोपासून केरळच्या चंडीवाद्यापर्यंतची पथके, लेझीम पथकासह बेंजोच्या तालात या मिरवणुका काढण्यात आल्या.
शाहीर देशमुख गातो पोवाड्याला...!
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांमुळे आजही शिवजयंतीच्या उत्साहात भर घातली जाते, यात शंका नाही. खणखणीत आवाज, प्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्याची निवेदनशैली, त्याला आवश्यक असणारा आवाजातील चढउतार यांमुळे गेली अनेक वर्षे शाहीर देशमुख यांचे पोवाडे मराठी मनांमध्ये चैतन्य निर्माण करतात. शिवाजी महाराजांबरोबरच बाजी, तानाजी, येसाजी यांच्याही कर्तृत्वाला यानिमित्ताने उजाळा मिळाला.