कोल्हापूर : छोटा भीम, मोटू-पतलूची ‘क्रेझ’ कायम, आकर्षक स्कूल बॅगांनी रंगल्या बाजारपेठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:41 PM2018-06-12T13:41:15+5:302018-06-12T13:41:15+5:30
गेल्या आठवड्यापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे.
कोल्हापूर : गेल्या आठवड्यापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे.
दरवर्षी पालकांना नवीन स्कूल बॅग घेण्याशिवाय पर्याय नसल्याने स्कूल बॅग खरेदीसाठी पालकांनी मोठी गर्दी केली आहे. यंदाही स्कूल बॅगमध्ये छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमनची क्रेझ कायम राहिली आहे.
शाळेत जायचे म्हटले की प्रथम खरेदी सुरू होते ती शाळेच्या दप्तराने. दप्तराचे आता नामांतर होऊन ‘स्कू ल बॅग’ हे नाव प्रचलित झाले आहे. स्पर्धेच्या युगात वह्या, पुस्तकांनी स्कूल बॅग नेहमीच भरलेली असते. त्यामुळे दरवर्षी ती नवीन घेतल्याशिवाय पर्याय नाही.
शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्यापैकी महत्त्वाची खरेदी म्हणजे स्कूल बॅग होय. ही बॅग खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची व विद्यार्थ्यांची झालेली गर्दी.(छाया : नसीर अत्तार)
शहरासह- उपनगरांतील दुकाने नव्या कलरफुल बॅगेने फुलली आहेत. कार्टून चॅनेलवरील कार्टूनमधील एखादे पात्र मुलांच्या आवडीचे असते. अशा कार्टूनमधील पात्रांची चित्रे असलेल्या स्कूल बॅगला मागणी वाढत आहे.
गतवर्षीपेक्षा साधारणपणे १० ते १५ टक्के स्कूल बॅगच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसते. यंदा स्कूल बॅगचे दर साधारणपणे १२५ रुपयांपासून १४०० रुपयांपर्यंत आहेत तसेच काही दुकानदार ग्राहकांच्या मागणीनुसार स्कूल बॅग शिऊनही देतात.
यांची क्रेझ...
छोटा भीम, मोटू-पतलू, पोकेमॉन, स्पायडर मॅन, मिकी माऊस, अँग्री बर्ड, बार्बी डॉल, डोनाल्ड डक आणि बॅटमॅन अशा विविध कार्टून्स स्कूलबॅगसह विविध संदेश असलेल्या कलरफुल स्कूल बॅगेला मागणी आहे; पण, त्यासोबत ‘थ्रीडी’ चित्र असलेल्या दप्तरांना मागणी वाढली आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा स्कूल बॅग दरामध्ये जीएसटीमुळे दरामध्ये जरा फरक दिसत आहे तरी साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. मुलांना कार्टूनची चित्र असलेल्या बॅगला मागणी आहे.
सुनीता साळवी,
स्कूल बॅग विक्रेते