कोल्हापूर : ‘झीप क्वॉईन’च्या मुख्य सूत्रधारास कोठडी, पंधरा गुंतवणूकदारांच्या तक्रारी : दोन बुलेट, मोबाईल, संगणक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:05 AM2018-05-09T11:05:57+5:302018-05-09T11:05:57+5:30
झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधारास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधारास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित बालासाहेब ऊर्फ बालाजी भरत गणगे (वय ३८, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. संशयितांकडून दोन बुलेट, सात मोबाईल, तीन संगणक, दोन लॅपटॉप, आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सायबरतज्ज्ञांच्या सहकार्याने अभ्यासपूर्वक तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी दिली.
दरम्यान, संशयित बालाजी गणगे, राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल, संजय कुंभार या चौघांनी भागीदारीमध्ये सप्टेंबर २०१७ पासून ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ ही डिजिटल कंपनी सुरू करून महिन्याला पंधरा टक्के लाभांश बीट क्वॉईनच्या रूपात देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांकडून दहा हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत पैसे घेतले.
या पैशांतून त्यांनी काही गुंतवणूकदारांना बुलेट आणि प्रत्येकी तीन तोळे सोने बक्षीस म्हणून दिले. त्यांतील दोन बुलेट, सात मोबाईल, तीन संगणक, दोन लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले. नेर्लेकर आणि कुंभार यांच्या दोन आलिशान कारही या गुन्ह्यात जप्त केल्या जाणार आहेत. या चौघांनी अपहारातील रकमेतून काय खरेदी केली आहे, कोणाच्या नावे रक्कम गुंतविली आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.
काही साक्षीदारांकडेही चौकशी सुरू आहे. जमीन, रिकामे प्लॉट, फ्लॅटसह काही व्यवसायांमध्ये पैसे गुंतविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संपूर्ण तपास हा कागदोपत्री असल्याने सायबर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा असा संयुक्तपणे आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्याची व्याप्ती वाढत आहे.