कोल्हापूर : राम कदम यांची आमदारकी रद्द करा, जिजाऊ ब्रिगेड : शिवाजी चौकात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:12 AM2018-09-07T11:12:37+5:302018-09-07T11:24:01+5:30
जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाºया राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत गुरुवारी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर : जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली.
शिवाजी चौकात झालेल्या या निदर्शनांत महिलांना राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांना क्षुद्र समजणे हे आरएसएस व भाजपचे विचार आहेत. भाजपची सत्ता आल्यापासून बापट, दानवे, छिंदम यांच्यासारखे लोकप्रतिनिधी बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण दूषित करीत आहेत. यावर मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत अप्रत्यक्षपणे त्यांना पाठीशी घालत आहेत.
अशा बेताल वक्तव्यांबद्दल राम कदम यांची आमदारकी रद्द करावी; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थानच्या समितीतून त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्षा डॉ. जयश्री चव्हाण, रंजना पाटील, चारूशीला पाटील, सुनंदा चव्हाण, जयश्री जाधव, शैला बाबर, सीमा सरनोबत, आक्काताई चव्हाण, सायरा शेख, कार्तिकी जाधव, अलका देवाळकर, मीना नलवडे, रतन शेटके, वैशाली जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.