कोल्हापूर : व्यवस्थापन परिषदेवरील अधिसभा सदस्यांच्या निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:25 PM2018-02-26T19:25:38+5:302018-02-26T19:25:38+5:30
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व राहिले.
कोल्हापूर : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व राहिले.
विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. यात प्रारंभी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आणि अन्य उपक्रमांचा आढावा सादर केला.
यानंतर कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी अधिसभेच्या बैठकीचे कामकाज सुरू केले. यात सुरुवातीला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर अधिसभा सदस्यांची निवडणूक झाली.
यात विकास आघाडीच्या धनाजी कणसे, चंद्रशेखर कारंडे (प्राचार्य गट), निखिल गायकवाड (शिक्षक), धैर्यशील पाटील, राजूबाबा आवळे (व्यवस्थापन प्रतिनिधी) आणि संजय जाधव, लोभाजी भिसे (नोंदणीकृत पदवीधर) यांची, तर विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) प्रकाश कुंभार (शिक्षक) यांची बिनविरोध निवड झाली.
विद्या परिषदेवर प्रताप माने (व्यवस्थापन प्रतिनिधी) यांची, विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था तपासणीसाठीच्या सदस्यत्वासाठी विकास आघाडीच्या किशोर जाधव, तर स्थायी समितीवर एल. जी. जाधव (प्राचार्य), मधुकर पाटील (नोंदणीकृत गट) यांची बिनविरोध निवड झाली. अध्यापक गटातील एका जागेसाठी सुटाच्या प्रा. ईला जोगी आणि विकास आघाडीचे वसंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.
यावर विकास आघाडीचे प्रताप माने, मोहन राजमाने यांनी वसंत पाटील यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले. यावर प्रा. जोगी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वसंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विद्यापीठ तक्रार निवारण समितीवरील शिक्षक सदस्यत्वासाठी निवडणूक झाली.
यात सुटाचे नीळकंठ खंदारे आणि विकास आघाडीचे निखिल गायकवाड यांच्यात लढत झाली. सुरुवातीला सुटा आणि विकास आघाडीकडून आपापल्या उमेदवाराच्या बिनविरोध निवडीसाठी एकमेकांना आवाहन करण्यात आले. १५ मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली; मात्र बिनविरोधचे प्रयत्न फोल ठरले. अखेर निवडणूक झाली.
अधिसभा सदस्यांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत ३६ मतांसह निखिल गायकवाड यांनी बाजी मारली. नीळकंठ खंदारे यांना आठ मते मिळाली. विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती निवड व छाननी समितीवर सदस्यत्वासाठी विकास आघाडीचे सतीश घाटगे आणि सुटाचे ए. बी. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. यात पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.
विद्यापीठाला नवी ओळख द्यावी
सहकार्य, संवाद आणि सहभागाद्वारे विद्यापीठाला अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांवरील सदस्यांनी नवी ओळख द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले. ते म्हणाले, अधिकार मंडळाच्या सभांचे कामकाज आयटीसी बेस्ड् होणार आहे. त्याची सुरुवात या अधिसभेसाठी आलेल्या सदस्यांचा टीए-डीए भत्ता आॅनलाईन जमा करून केली आहे. यात विद्यापीठ राज्यात आदर्श ठरेल. विद्यापीठात प्लास्टिक बंदी राबविण्यात येत आहे. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना सदस्यांनी सहकार्य करावे.