कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’ आंदोलनाची रणनीती गणेशोत्सवानंतर ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 05:41 PM2018-09-03T17:41:17+5:302018-09-03T17:44:04+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गणेशोत्सवानंतर खंडपीठ कृती समितीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गणेशोत्सवानंतर खंडपीठ कृती समितीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाचेसर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गेली ३० वर्षे आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाचे नवे न्यायाधीश आॅगस्टमध्ये रूजू होणार होते. सप्टेंबर उजाडला तरी त्यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याने सर्किट बेंचचा प्रश्न रेंगाळला आहे. सोमवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली.
सहा जिल्ह्यांतील वकील कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. वकिलांनी रॅली, उपोषण, ‘बेमुदत काम बंद’, आदी आंदोलने केली, मंत्रिमंडळासोबत बैठका घेतल्या; परंतु आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनांचे गाजर दाखविले जात आहे.
उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश १८ आॅगस्टपर्यंत रूजू होणार होते. ते अद्यापही नियुक्त झालेले नाहीत. ते रूजू झाल्यानंतरच सर्किट बेंच संबंधीच्या हालचाली गतिमान होणार आहेत. दरम्यान खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस यांच्यासह पदाधिकाºयांनी सोमवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनला भेट दिली.
सर्किट बेंच लढ्यामध्ये सातारा जिल्ह्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. तसेच तो यापुढेही अग्रभागी राहील. सहा जिल्ह्यांच्या पदाधिकारी व वकील वर्गाचा मेळावा लवकरात लवकर घेऊन आंदोलनाचा निर्णायक लढा सुरू करावा, असे मत सातारा जिल्हा बारच्या ज्येष्ठ वकिलांनी मांडले. त्यावर अॅड. चिटणीस यांनी सर्किट बेंचचा प्रश्न हा प्रामुख्याने पक्षकारांशी निगडित आहे.
सहा जिल्ह्यांतील वकिलांमध्ये या प्रश्नाबाबत कोणतेही दुमत नाही. गणेशोत्सवानंतर सर्व जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा लवकरच घेऊ व निर्णायक लढा सुरू करू, असे सांगितले.