देशभर सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:42 AM2019-12-21T11:42:40+5:302019-12-21T11:44:09+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाचे चौक, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पाहून शहराला छावणीचे रूप आल्याचे दिसत होते.
कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाचे चौक, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पाहून शहराला छावणीचे रूप आल्याचे दिसत होते.
नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात महाराष्ट्रासह १५ राज्यांत विद्यार्थी व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात उतरले होते. शुक्रवारी कोल्हापुरात काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले.
पोलीस मुख्यालयात सकाळी १0 वाजता पोलिसांचा फौजफाटा बोलवून त्यांना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी सूचना दिल्या. मुख्यालयातील सायबर विभाग, जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा यांसह राज्य राखीव दलाचे जवान, भारत बटालियनचे जवान, आदी सर्व विभागांतील कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर पडले होते.
सकाळी १0 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण शहरात सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर पोलीस उतरल्याने शहरात कोठेही दंगल, अनुचित प्रकार घडला नाही.