देव आम्हा एकच ठावे, घाम गाळुनी काम करावे; कष्टकऱ्यांचा गणेशोत्सव रस्त्यावरच
By पोपट केशव पवार | Published: September 23, 2023 01:58 PM2023-09-23T13:58:52+5:302023-09-23T14:00:06+5:30
व्यवसायातून बांधली श्रमाची पूजा
पोपट पवार
कोल्हापूर : 'ते' सगळेच छोट्या-मोठ्या व्यवसायातून कुटुंबाचा गाडा चालविणारे, प्रत्येकाची सकाळ पहाटे पाचपासून सुरू होणारी. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सण-समारंभ, उत्सव त्यांच्या गावाही नाही. उभे कोल्हापूर शहर सध्या गणेशोत्सवात न्हाऊन निघाले असताना कष्टकरी, कामगार मात्र बाप्पाच्या रुपात श्रमाची पूजा बांधण्यातच गुंतला आहे.
कुणाचा चहाचा गाडा तर कुणाची फळाची गाडी, फुले विकून आयुष्य सुगंधी करणारे असोत की भाजीविक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे, हा कष्टकरीवर्ग गणेशोत्सव काळातही पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावरच्या व्यवसायातून या आनंदात सामील झाला. घरात गणपती असताना आम्हाला उदरनिर्वाहासाठी दिवसभर बाहेर व्यवसाय करावा लागत असला तरीही व्यवसायाने दिलेली रोजी-रोटीच आमच्यासाठी दैवत्व आहे. त्यामुळे 'देव आम्हा एकच ठावे, घाम गाळुनी काम करावे' अशी भावना कष्टकरी-कामगारांतून व्यक्त झाली.
गणपतीच्या काळात कॉलनीतील सर्वच महिला एकत्र येतात. पण ते भाग्य आमच्या वाट्याला नाही. गेल्या २५ वर्षापासून फुले विक्रीचा व्यवसाय करते. घरात गणपती आणला असला तरी व्यवसाय बंद कसा करायचा. या व्यवसायानेच कुटुंबाला सावरले आहे. त्यामुळे हा व्यवसायच आमच्यासाठी दैवत्व आहे. नंदा कांबळे, फुलविक्रेत्या. लक्ष्मीपुरी भाजी मंडई, (प्रयाग चिखली, ता. करवीर)
गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण अडचणीच्या काळात या व्यवसायानेच तारले आहे. गणपतीच्या काळात घरी थांबता येत नसल्याचे वाईट वाटते, पण, कुटुंबाची प्रगती साधायची असेल तर व्यवसायाला पहिले प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही या व्यवसायाच्या रुपातच बाप्पाला पाहतो. पूजा दिलीप सकटे, भाजीविक्रेत्या, लक्ष्मीपुरी भाजी मंडई. (गडमुडशिंगी, ता. करवीर)
घरात गणपती आणला आहे. पण, दिवसभर चहाच्या स्टॉलवर असते. संध्याकाळी गेल्यानंतरच पूजाअर्चा करते. ३५ वर्षापासून चहाचा स्टॉल आहे. त्यात खंड पडू दिला नाही. या व्यवसायामुळे सण, समारंभात जाता येत नाही. पण या स्टॉलमुळेच कुटुंब सावरले ते कसे विसरायचे. - छाया जयवंत मोरे, चहाविक्रेत्या, नाना पाटीलनगर.
पहाटे पाच वाजल्यापासून रस्त्यावर
भाजीविक्री करणाऱ्या महिलांना पहाटे पाच वाजताच लिलावावेळी मार्केट यार्डात जाऊन भाजी खरेदी करावी लागते. ऊन-वारा-पाऊस काहीही असले तरी हा नियम चुकत नाही. घरात गणपती बसवला असला तरी व्यवसाय बंद करणे परवडणारे नाही, त्यामुळे या रुपानेच आम्ही देव पाहतो, अशी भावना राधाबाई भिसुरे यांनी व्यक्त केली.