कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:11 PM2017-07-22T18:11:38+5:302017-07-22T18:11:38+5:30
पाणीपातळीत फुटाने वाढ: सुतारमळ्यातील तीन कुटुंबांचे स्थलांतर
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२२ : गेले पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरात शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभर सूर्यदर्शनही घडल्याने महापूर पाहण्यासाठी नागरिकांनी शिवाजी पुलावर प्रचंड गर्दी केली. पाणीपातळी झपाट्याने वाढू लागल्याने शुक्रवारी (दि. २१) दक्षता म्हणून शिवाजी पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद केली होती. शनिवारी अवजड वाहतूक वगळता ती पूर्ववत सुरू करण्यात आली. धरणक्षेत्रात पावसाचा ओघ सुरूच राहिल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, दिवसभरात राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी फुटाने वाढून ती ४२ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे.
महापालिका आपत्कालीन यंत्रणा सतर्क -
शिवाजी पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू
पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दसरा चौकानजीकच्या सुतार मळ्यात काही घरांत पाणी शिरू लागल्याने दुपारनंतर तीन कुटुंबांना चित्रदुर्ग मठात स्थलांतरित करण्यात आले.
गेले पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. नद्यांना पूर आले आहेत. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जयंती नालाही दुथडी भरून वाहू लागला आहे. शनिवारी दिवसभर कोल्हापूर शहरात पावसाने उघडीप दिली असली तरीही पंचगंगा नदीच्या पुराची पाणीपातळी वाढत आहे. सायंकाळपर्यंत जामदार क्लबनजीक पाणी कायम होते. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यानजीक दिवसभरात पाणीपातळीत फुटाने वाढ झाली असून, ती ४२ पर्यंत पोहोचल्याने महापुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवाजी पुलावर पूर पाहण्यास गर्दी
गतवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्या पार्श्वभूमीवर पुराचे पाणी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढू लागल्याने दक्षता म्हणून शुक्रवारी सायंकाळी शिवाजी पूल सर्व वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्यामुळे वडणगे, चिखली, आदी भागांतील अनेक नागरिकांना शियेमार्गे महामार्गावरून कोल्हापूर शहरात यावे लागले. शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप देऊन दिलासा दिल्यानंतर सकाळपासून शिवाजी पुलावरून फक्त दुचाकी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे अवजड वाहतुकीला या पुलावरून पूर्णत: प्रवेश बंद ठेवण्यात आला. शिवाजी पुलाजवळ चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या पुलावरून महापुराचे दृश्य पाहण्यासाठी आणि ते मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
वाहनांचे पार्किंग पुलानजीक
वडणगे गावी जाण्यासाठी पवार पाणंदमार्गावर पुराचे पाणी आहे; त्यामुळे या वडणगे फाट्यावरील पेट्रोल पंप आणि जयहिंद धाब्याच्या परिसरात दुचाकी उभी करून नागरिक वडणगेकडे रवाना होत होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तसेच नव्या पुलाशेजारील जागेत मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्किंगची गर्दी झाल्याचे दिसत होते.
सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्लीवर लक्ष
पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी वाढत असल्याने जयंती नाल्याच्या पाण्याला फुग येऊन हे पाणी सुतारमळा आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत पसरत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. या दोन्ही ठिकाणी तसेच शुक्रवार पेठेतील पंचगंगा नदीच्या पुराच्या वाढणाऱ्या पाण्यावर ही यंत्रणा लक्ष ठेवून आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद गवळी यांनी पाणी शिरणाऱ्या भागांची पाहणी केली.