कोल्हापूर : शहराचे प्रदूषण घातक
By Admin | Published: November 5, 2014 12:26 AM2014-11-05T00:26:52+5:302014-11-05T00:30:14+5:30
मशीनद्वारे तपासणी : ‘हाय व्हॉल्युम सॅम्पलर’चा पंधरा दिवसांत अहवाल येणार
कोल्हापूर : शहरातील प्रदूषकांची पातळी सातत्याने वाढत आहे. उखडलेले रस्ते, वाहनांची वर्दळ यामुळे हवेतील सल्फर डायआॅक्साईड, सल्फर मोनोक्साईड, तसेच नायट्रोजन आॅक्साईडच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची शक्यता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली.
‘कॉमन मॅन’ संघटनेने वाढत्या प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने काल, सोमवारी आणि आज, मंगळवारी शहरातील राजारामपुरी, चप्पल लाईन, तसेच रंकाळा टॉवर परिसरात प्रदूषकांची पातळी मोजण्यासाठी हाय व्हॉल्युम सॅम्पलर मशीन्स लावली होती. आठ तास प्रदूषकांचे नमुने घेतल्यानंतर ही मशिन्स चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. याद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळास १५ दिवसांनी प्रदूषणाच्या पातळीचा अहवाल मिळणार
आहे. शहरातील धुळीचे आणि धुराचे प्रमाण पाहिले असता, शहराची प्रदूषण पातळी १५० मायक्रोग्रॅम/क्युबिक मीटर (म्युजी) पुढे जाण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त
केला आहे.
ठिकठिकाणी रस्ते उखडल्यामुळे वातावरणातील धूळ मोठ्या प्रमाणावर उडत आहे. तसेच वाहनांतील व कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे हवेतील सल्फर डायआॅक्साईड, सल्फर मोनोक्साईड, नायटोजन आॅक्साईडचे प्रमाण वाढले आहे. हिवाळ्याचे धुके व वाहनांचा धूर यांच्या मिश्रणाने हवेच्या प्रदूषण पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन श्वसनाचे विविध रोग उद्भवत आहेत. सततच्या प्रदूषित हवेमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. धुळीतील लहान कणांमुळे फुप्फुसाला संसर्ग होतो. वयोवृद्ध व रुग्णांसाठी शहरातील प्रदूषण प्राणघातक ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, प्रदूषणाची घातकता किती आहे, हे या मशीनचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषणाची पातळी म्युजी या युनिटमध्ये मोजतात. हाय व्हॉल्युम सॅम्पलर मशीनच्या साहाय्याने हवेतील प्रदूषके
शोषून घेतली जातात. आठ तासांसाठी ही मशीन वर्दळीच्या ठिकाणी ठेवली होती. शहरात विविध ठिकाणी ठेवलेल्या हाय व्हॉल्युम सॅम्पलर मशिन्समधील सॅम्पल परीक्षणासाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रदूषण पातळीचा अहवाल १५ दिवसांनी मिळणार आहे. तो प्राप्त झाल्यानंतर महापालिकेला सादर करण्यात येणार आहे
- वर्षा कदम, क्षेत्र अधिकारी,
प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर
कोल्हापुरातील जाऊळाचा गणपती ते रंकाळा बसस्थानक दरम्यानच्या रस्त्यावर भोसले मेडिकलशेजारी ठेवलेले हाय व्हॉल्युम सॅम्पलर मशीन.
‘कॉमन मॅन’चा फौजदारीचा इशारा
‘नेमेचि येतो पावसाळा’प्रमाणे महापालिका प्रशासनाने या विषयात लक्ष दिलेले नाही. निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या लोकप्रतिनिधींनाही या विषयाकडे लक्ष देण्यास फुरसत नाही. उखडलेल्या रस्त्यांवरून हवेत मोठ्या प्रमाणावर धूळ उडली जात आहे. रहदारीमुळे वाहनधारकांबरोबरच रहिवाशी आणि पादचाऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने प्रदूषण मंडळाच्या अहवालावर तत्काळ कार्यवाही न केल्यास पालिकेवर फौजदारी करण्याचा इशारा ‘कॉमन मॅन’ संघटनेचे अध्यक्ष बाबा इंदुलकर यांनी दिला आहे.