कोल्हापूर : दहावीमध्ये कोल्हापूर विभागाची ‘डबल हॅट्ट्रिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:19 PM2018-06-08T17:19:49+5:302018-06-08T17:19:49+5:30
महाविद्यालयीन शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या दहावीचा (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाने ९३.८८ टक्क्यांसह सलग सहाव्यांदा राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ‘डब्बल हॅट्ट्रिक’ साधली.
कोल्हापूर : महाविद्यालयीन शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या दहावीचा (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाने ९३.८८ टक्क्यांसह सलग सहाव्यांदा राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ‘डब्बल हॅट्ट्रिक’ साधली.
या वर्षी निकालात ०.२९ टक्क्यांनी वाढ असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ३.१३ टक्क्यांनी अधिक आहे. विभागामध्ये ९५.३५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला. सातारा जिल्हा ९३.४३ टक्क्यांनी द्वितीय, तर सांगली जिल्हा ९२.२५ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला. त्यानंतर कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती प्रभारी विभागीय सचिव टी. एल. मोळे, प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रभारी विभागीय सचिव मोळे म्हणाले, यावर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २२४७ शाळांतील १,४३,८२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १,३५०१८ जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ७३,६५२ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांचे प्रमाण ९२.४८ टक्के, तर ६१,३६६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची एकूण टक्केवारी ९५.६१ आहे. पुनर्प्रविष्ट विद्यार्थ्यांचा निकाल ४०.७७ टक्के लागला आहे.
कोल्हापूर विभागाने सलग सहाव्यांदा राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ५९०४३ विद्यार्थी, साताऱ्यामधील ४०२४१ विद्यार्थी, तर सांगलीतील ३८४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणपत्रिकांच्या वितरणाची तारीख मंडळातर्फे लवकरच जाहीर केली जाईल.
प्रभारी शिक्षण उपसंचालक लोहार म्हणाले, गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरातील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या पत्रकार परिषदेस सहायक सचिव नंदू पवार, साताऱ्याच्या उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सांगलीच्या शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. बस्तवडे, आदी उपस्थित होते.
जिल्हानिहाय निकाल
कोल्हापूर : ९५.३५ टक्के
सातारा : ९३.४३ टक्के
सांगली : ९२.२५ टक्के
- कोल्हापूर विभागाच्या निकालात यावर्षी ०.२९ टक्क्यांनी वाढ
- गैरमार्ग प्रकारांबाबत ७६ जणांवर कारवाई झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे.
- विभागातील २३८९ पुनर्प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण
- गुणपत्रिका मिळाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ