कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील संभाजी पुलाची स्वच्छता, डीसीएफसी फौंडेशनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:50 AM2019-01-14T10:50:30+5:302019-01-14T10:53:15+5:30
वाढलेली झाडेझुडपे, कचऱ्याचा कोंडाळा आणि प्रातर्विधीच्या दुर्गंधीत अडकलेल्या लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज पुलाने मोकळा श्वास घेतला़. या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कोल्हापूर : वाढलेली झाडेझुडपे, कचऱ्याचा कोंडाळा आणि प्रातर्विधीच्या दुर्गंधीत अडकलेल्या लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज पुलाने मोकळा श्वास घेतला़. या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुलाच्या स्वच्छतेनंतर रंगरंगोटी करून, फुलांची झाडे लावून रांगोळी काढण्यात आली़ डीसीएफसी फौंडेशनच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत डी. एम. एन्टरप्रायझेस, तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला़.
गेल्या काही वर्षांपासून लक्ष्मीपुरीतील छत्रपती संभाजी पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. महापालिका आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. या पुलाची दुरावस्था, तसेच ओंगळवाणे स्वरूप पाहून डीसीएफसी फौंडेशनच्या तरुणांनी या ठिकाणची जिजाऊंच्याजन्मदिनी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला़, त्यांना डी. एम. एन्टरप्रायझेसचे सहकार्य मिळाले.
पुलावर स्वच्छता सुरू असल्याचे कळताच महापालिकेचे कर्मचारीही त्यामध्ये सहभागी झाले. या सर्वांच्या प्रयत्नातून अवकळा पसरलेल्या छत्रपती संभाजी पुलाला झळाली मिळाली़ स्वच्छता झाल्यानंतर पुलावर असलेल्या ढाल-तलवारी रंगविल्या. या ठिकाणी फुलझाडे लावली.
छत्रपती संभाजी महाराज पूल, असा फलकही लावून त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आल्याने संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला़. या स्वच्छता मोहिमेत प्रणव रणवरे, निखिल मोरे, विराज पोतदार, शुभम खेडेकर, सौरभ पाटील, डी. एम. ग्रुपचे अशुतोष जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़