सलग चौथ्या दिवशीही कोल्हापूर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:59+5:302021-04-09T04:24:59+5:30
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्य सरकारने दैनंदिन व्यवहारावर कडक निर्बंध लादले. ...
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्य सरकारने दैनंदिन व्यवहारावर कडक निर्बंध लादले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच व्यवहार वगळता बाकीची सर्व दुकाने व व्यापारी अस्थापना बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. कडक निर्बंध म्हणजे दुकाने बंद ठेवावी लागतील, असे वाटले नाही; पण जेव्हा सोमवारी प्रत्यक्ष दुकाने उघडण्याची वेळ आली तेव्हा पोलीस व महापालिका प्रशासनाने ती बंद करण्यास भाग पाडले.
व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रशासनास दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती करत आहेत; परंतु जिल्हा, पोलीस व महापालिका प्रशासनाने त्यांना तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून रोज सकाळी व्यापारी, दुकानदार आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी येतात. दुकाने उघडतात आणि प्रशासनाच्या दबावामुळे पुन्हा बंद करून घरी जातात. गुरुवारीदेखील हाच अनुभव आला.
गुरुवारी शहरात अनेक ठिकाणी दुकानदार दुकानाच्या दारात थांबून होते. काहींनी अर्धवट शटर उघडे ठेवून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पोलीस, महापालिकेची गाडी आली की लगेच दुकान बंद करायचे आणि गाडी पुढे गेली की परत व्यवसाय सुरू करायचा, असा दिवसभर खेळ सुरू राहिला. महाद्वार, ताराबाई रोड, पापाची तिकटी, चप्पल लाइन, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, उमा टॉकीज रोड, टेंबे रोड, मिरजकर तिकटी या परिसरातील दुकाने बंद राहिली. लक्ष्मीपुरीतील गर्दीवर मात्र कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. एकाच ठिकाणी धान्याची दुकाने, मसाल्याची दुकाने, भाजी मंडई, फळ बाजार असल्यामुळे ही गर्दी होत आहे.
(फोटो व ओळी स्वतंत्र टाकले आहेत.)