कोल्हापूर कडकडीत बंद अवघा मराठा रस्त्यावर : आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही; भगव्याची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:25 AM2018-08-10T01:25:24+5:302018-08-10T01:25:31+5:30
कोल्हापूर : कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा, असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने फुलून गेले. बंदच्या काळात शहरात एकही दुकान उघडले नाहीच, शिवाय साधी चहाची टपरीही कुठे दिसून आली नाही.
रॅलीसाठी वापरल्या गेलेल्या दुचाकी वगळता एकही वाहन रस्त्यावर पाहायला मिळाले नाही. गल्ली बोळातून, चौकाचौकांतून, प्रमुख रस्त्यावरून हातात भगवे ध्वज घेऊन ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत फिरणारे मराठा समाजातील तरुण असेच चित्र संपूर्ण शहरभर पाहायला मिळाले.
कोल्हापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे; त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील समाजही या आंदोलनात सहभागी झाला आहे. आंदोलनाचाच एक भाग म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चाने महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. या बंदला कोल्हापुरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
गुरुवारी पूर्वनियोजित बंद असल्याने सकाळी कोणीही दुकानदार आपल्या दुकानाकडे फिरकले नाहीत. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, रिक्षाचालक यांनी आधीच बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता; त्यामुळे संपूर्ण शहराची चाकं बंद झाली. शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा बंद राहिल्या. त्यांचे दरवाजेही उघडले गेले नाहीत. मध्यवर्ती बस स्थानक, रंकाळवेश बस स्थानक पूर्णपणे बंद ठेवले होते. एस. टी. व के. एम. टी.ची एकही बस वर्कशॉपमधूनबाहेर पडली नाही. बस स्थानकाच्या परिसरात शुकशुकाट होता. विशेष म्हणजे एस. टी. बसस्थानकांचे मुख्य दरवाजेच बंद ठेवले होते. शहरात दररोज सुमारे सात ते आठ हजार रिक्षा धावत असतात; पण गुरुवारी मात्र एकही रिक्षा रस्त्यावर न आणता रिक्षा सेवा बंद ठेवणेच रिक्षा मालकांनी पसंत केले; त्यामुळे वाहतुकीचे सर्वच मार्ग आपोआप बंद झाले. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे बंद राहिले.
शहरातील सर्व प्रमुख व्यापारी पेठा, भाजी मंडई, मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, मॉल, पेट्रोल पंप बंद राहिले. बाजार समितीत गुरुवारी कमी प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली; पण त्याचीही विक्री झाली नसल्याने हा माल तेथेच पडून राहिला. शहरात केवळ औषध दुकाने व रुग्णालये वगळता एकाही दुकानाचा दरवाजा अथवा शटर उघडले गेले नाही. अत्यंत कडकडीत बंद पाळला गेला. विशेष म्हणजे कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.
रॅलींमुळे दणाणले शहर
अवघा मराठा समाज गुरुवारी रस्त्यावर उतरला होता. ऐतिहासिक दसरा चौकात सभेला येण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले होते; परंतु त्याठिकाणी सर्वांना एकत्र येणे अशक्य होते; त्यामुळे पोलिसांनी चहूबाजूंनी दसरा चौकाकडे जाणारे रस्ते तीन टप्प्यांत बॅरिकेटस् टाकून रोखले होते. दसरा चौक गर्दीने फुलून गेल्याने हजारो तरुणांना तिकडे जाता आले नाही; त्यामुळे १००-२०० तरुणांचे जथ्ये तयार व्हायला लागले. या जथ्यांनी मग मोटार सायकल रॅली काढण्यास सुरुवात केली. अनेक तरुणांनी आपापल्या भागातूनच मोटारसायकल रॅली काढली. या रॅली व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी, महाद्वार, गंगावेश, रंकाळवेश, पापाची तिकटी, माळकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी या भागांतून फिरायला लागल्या. सायलेन्सर काढलेल्या दुचाकी, हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज आणि ‘जय भवानी - जय शिवाजी, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी अवघे शहर दणाणून गेले. सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत तर गल्लीबोळात, चौकाचौकांत, प्रमुख रस्त्यांवर या रॅली पाहायला मिळत होत्या. जेवढे लोक दसरा चौक परिसरात होते, त्यापेक्षा किती तरी लोक अशा रॅलीतून सहभागी झाले होते.
राजारामपुरीत सगळंच बंद
राजारामपुरी परिसरातील सर्व गल्ल्यांतील व्यापार पेठांतील कापड दुकाने, हॉटेल बंद होती; परंतु राष्टÑीयीकृत तसेच खासगी बॅँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची कार्यालये, वित्तीय कंपन्यांची कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. ही माहिती शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज, कमलाकर जगदाळे यांना समजताच त्यांनी २00 तरुणांना सोबत घेऊन मोटारसायकल रॅली काढली. बॅँकांच्या कार्यालयात घुसून कर्मचारी व अधिकाऱ्यांना दमबाजी करत कामकाज बंद ठेऊन शटर बंद ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या. एवढेच नाही तर कामकाज करत बसलेल्या सर्व कर्मचाºयांनाही आतून बाहेर काढले आणि घरी जायला सांगितले. आयसीआयसीआय, स्टेट बॅँक आॅफ इंडिया, कॉसमॉस, युनियन बॅँक, कॅनरा बॅँक, एक्सीस बॅँक, जीपी पारसिक बॅँक आदी बॅँकांच्या शाखा सक्तीने बंद पाडल्या गेल्या.
तरुणांचा आक्रोश, धोक्याची घंटा
गेल्या दोन अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. १५ आक्टोबर २०१६ रोजी कोल्हापुरात प्रचंड मोठा मूक मोर्चा निघाला होता. तेव्हापासून आज आरक्षण मिळेल, उद्या मिळेल या अपेक्षेत असलेल्या मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विशेषत: तरुणांमध्ये राज्य सरकार विरोधात तीव्र संताप असल्याचे गुरुवारी दिसून आले. रॅलीत सहभागी झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी होती. त्यांच्याकडून प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. अनेक तरुणांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने लाखोल्या वाहिल्या जात होत्या. त्यातूनच तरुणांच्या मनातील चीड दिसत होती. आतापर्यंत कोल्हापूरकरांनी संयम बाळगला असला तरी, भविष्यकाळात हा तरुण कोणत्या थराला जाईल, याची चिंता वाढविणारी परिस्थिती बनली असल्याचेही जाणवले.
महापालिका कर्मचाºयांना शिवीगाळ
महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय तसेच नगररचना कार्यालय राजारामपुरी पहिल्या गल्लीत आहे. या ठिकाणी गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना ही माहिती कळताच कार्यकर्ते कार्यालयात घुसले. त्यांनी कर्मचारी व अधिकाºयांना सक्तीने बाहेर काढले. एवढेच नाही तर त्यांना चक्क शिवीगाळदेखील करण्यात आली. जर कार्यालयात थांबला तर एकही खुर्ची अन् टेबल कार्यालयात राहणार नाही, असा सज्जड इशाराही कार्यकर्त्यांनी दिला; त्यामुळे नाईलाज झालेले सर्व कर्मचारी व अधिकारी कार्यालयातून बाहेर पडले.
अनियंत्रित गर्दीला कौशल्याने हाताळले
गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले होते. त्यानुसार अनेकांनी बंद आणि दसरा चौकात होणाºया सभेस उपस्थित राहण्याची तयारी केली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून समाजाचे जथ्ये दसरा चौकाकडे जात होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे जमावाच्या झुंडीच्या झुंडी शहराच्या विविध भागांत रॅली काढण्यात मश्गूल झाल्या. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते आणि जमाव कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे सभेतील भाषणे झाल्यानंतर जमावाला शांतपणे घरी घालविणे एक आव्हान होते. घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फू र्तीदायक गाणी लावली. ‘जय भवानी, जय शिवाजी, मर्द मराठा’ अशा गाण्यांच्या तालावर उपस्थित जमाव नृत्य करायला लागला. ज्यांना नृत्य करायचे होते ते दसरा चौकात थांबून राहिले. ज्यांना त्यात रस नव्हता त्यांनी माघारी फिरणे पसंत केले. ही नीती आखल्यामुळे जमाव एकाच वेळी दसरा चौकातून न जाता तो हळूहळू निघून गेला. शांततेत माघारी फिरला.
छत्तीस तासांहून अधिक काळ ‘कोल्हापूर बंद’
इचलकरंजीत बंदला उत्स्फूूर्त प्रतिसाद
कागलमध्ये दिवसभर बंद;
गडहिंग्लजला महामोर्चा
शिरोळ तालुक्यामध्ये मराठ्यांचा एल्गार
बारा हजार वकिलांचा आंदोलनात सहभाग
पोलिसांचा २० तास
खडा पहारा
कोल्हापूर शहर व परिसराने यापूर्वी अनेक वेळा विविध कारणांनी ‘कोल्हापूर बंद’ पाहिला. बंदमध्ये सहभाग घेतला; परंतु गुरुवारसारखा बंद बºयाच वर्षांनी पाहिला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोल्हापुरातील इतर ‘बंद’च्या काळात सर्वसाधारणपणे दुपारी चार वाजेपर्यंत व्यवहार बंद राहायचे आणि त्यानंतर व्यवहार सुरळीत व्हायचे. मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ जाहीर झाल्यानंतर बुधवारी रात्रीपासूनच सर्व व्यवहार बंद झाले.
च्गुरुवारी दिवसभरात कोणीही दुकानांची शटर्स उघडली नाहीत. शुक्रवारी सकाळी नऊनंतरच दुकाने उघडली जातील. त्यामुळे ३६ तासांचा हा ‘बंद’ पाळला गेला. १९९३ मध्ये अंबाबाई मंदिरात सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर कोल्हापूर शहरात सलग तीन दिवस कर्फ्यू लागला होता. त्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी एवढा मोठा ‘बंद’ पाहायला मिळाला.
सर्वाधिक संख्येने तरुण रस्त्यावर
मराठा समाजातील तरुणांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मोठा आक्रोश आहे. नोकरी नसल्याने त्यांच्यात सरकारविरुद्ध तीव्र असंतोष आहे.