आज कोल्हापूर बंद, जिल्ह्यात धरणे, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:05+5:302021-09-27T04:27:05+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी व कामगार कायद्यांच्या विरोधात आज, सोमवारी होत असलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर ...
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी व कामगार कायद्यांच्या विरोधात आज, सोमवारी होत असलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी, तसेच कामगार संघटनांनी घेतला आहे. कोल्हापुरात बंद पाळून ठिकठिकाणी सर्वत्र धरणे, निदर्शने, तसेच सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी व कामगार कायद्याच्या विरोधात गेल्या काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा, तसेच या कायद्यांना कडाडून विरोध करण्याकरिता आज सोमवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. या देशव्यापी आंदोलनात कोल्हापुरातील सर्व संघटनांनी सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर यावे, असे आवाहन कोल्हापुरातील डाव्या पक्षांनी केले आहे.
आज, सोमवारी सकाळी दहा वाजता बिंदू चौक येथे सर्व कामगार संघटना, तसेच शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जमण्यास सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी धरणे, निदर्शने व सभा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, शाहुवाडी, मुधाळतिट्टा, कळे या ठिकाणीही धरणे, तसेच निदर्शने होणार आहेत.
या बंदमध्ये कोल्हापुरातील शेतकरी संघटनांसह सीटू, आयटक, लालनिशाण, ऊसतोडणी कामगार, बांधकाम, आशा वर्कर, इंजिनीअरिंग कामगार संघटना सहभागी होत आहेत. याशिवाय राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.
- किरकोळ दुकानदार होणार सहभागी -
शहरातील सर्व किरकोळ दुकानदारांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. मोदी सरकार कार्पोरेट कंपन्यांच्या हिताचे धोरण राबवित आहे. शॉपिंग मॉलमुळे स्वत:च्या हिमतीवर व्यवसाय करणारे किरकोळ दुकानदार केंद्र सरकारमुळे अडचणीत आले आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर हरेल यांनी म्हटले आहे.
- फेरीवाल्यांचाही पाठिंबा -
कोल्हापूर जिल्हा व शहर फेरीवाला कृती समितीच्या वतीने बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. शहरातील सर्व फेरीवाले सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेवतील, असे माजी महापौर आर.के. पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पोवार यांनी म्हटले आहे.