Raksha Bandhan : सैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, कोल्हापुरातील विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:51 AM2018-08-24T11:51:32+5:302018-08-24T12:00:22+5:30
माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.
कोल्हापूर : माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. एकीकडे तरुण सैनिक सीमेवर शहीद होत आहेत, तर दुसरीकडे व्यसनाच्या नशेत अनेक तरुण जीवन संपवत आहेत. समाजातील ही स्थिती बदलली पाहिजे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते जवानांना राख्या बांधण्यात आल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
शाहू स्मारक भवनात स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांकरिता रक्षाबंधनासाठी संकलन केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. शहीद कुंडलिक माने यांच्या आई ज्ञानूबाई माने, वडील केरबा माने, निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील उपस्थित होते.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात शालेय विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
महापौर बोंद्रे म्हणाल्या, ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. छत्रपती ताराराणी मुलींसाठी, सैनिक स्कूलसाठी कटिबद्ध राहू. ज्ञानूबाई माने म्हणाल्या, ‘मुलाच्या जाण्याचे दु:ख आहे; पण एक मुलगा शहीद झाला म्हणून काय झाले? देशरक्षणासाठी गरज पडल्यास माझ्या नातवंडांनाही सीमेवर पाठवायला मी कमी करणार नाही.’
कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बॉर्डर’ विषयावर नाटिका सादर केली. शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, ‘मर्द मराठे खरे’ हे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते मराठा बटालियनचे लेफ्टनंट तानाजी चौगुले यांच्याकडे संकलित केलेल्या सुमारे दोन लाख राख्या सुपूर्द करण्यात आल्या. ‘शिवगंधार’ प्रस्तुत ‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला.
देशभक्तिपर गाण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला. महिलांनी मराठा बटालियनच्या जवानांना औक्षण करीत राखी बांधली; त्यामुळे वातावरण भावपूर्ण बनले. संयोजक किशोर घाटगे यांनी प्रास्ताविक केले.
सुखदेव गिरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, डॉ. सायली कचरे, अंकुश टोपले, माधुरी नकाते, विशाल देवकुळे, सीमा मकोटे, धनंजय नामजोशी, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले, यशश्री घाटगे, आनंद गुरव, युवराज जाधव, सुनील सामंत उपस्थित होते.