कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:33 AM2019-08-20T10:33:52+5:302019-08-20T10:34:55+5:30
महापुराच्या काळात जिल्हा परिषदेत स्थलांतरित झालेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ जागेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले; परंतु सोमवारी खऱ्या अर्थाने हे कार्यालय गजबजल्याचे चित्र होते.
कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेत स्थलांतरित झालेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ जागेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले; परंतु सोमवारी खऱ्या अर्थाने हे कार्यालय गजबजल्याचे चित्र होते.
महापुराच्या काळात पाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनासह जमीन विभाग, आस्थापना विभाग, गृह विभाग, ग्रामपंचायत विभाग, आदी कार्यालयांमध्ये पाणी पाणी झाले होते; त्यामुळे मंगळवारी (दि. ६) दुपारनंतर कार्यालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, फोन अशा यंत्रणा काढून त्या दुुसºया मजल्यावर ठेवण्यात आल्या.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा परिषदेत तळ हलविला होता. तेथूनच महापुरावर नियंत्रणाचे काम सुरू होते. पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनीही या ठिकाणी येऊन परिसर चकाचक केला.
या ठिकाणी तीन दिवसांपासून पूर्ववत कामकाज सुरू झाले; परंतु काही कार्यालयांमध्ये स्वच्छता सुरू असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही काळ एका कार्यालयातून कामकाज केले. सोमवारी खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच गजबजल्याचे दिसले. प्रत्येक कार्यालयात पूर्वीप्रमाणेच लगबग सुरू होती.