कोल्हापूर : सुरू झालेली वाहतूक शनिवारी पुन्हा दुपारी १ ते ४ बंद, शिवाजी पुल स्ट्रक्चरल आॅडिट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 07:52 PM2018-02-09T19:52:08+5:302018-02-09T20:00:17+5:30
ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर : ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असल्याने या कालावधीत पुन्हा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पुलावरून अवजड वगळता सर्व वाहतूक सुरू होती. शनिवारी सायंकाळपासून पुन्हा ती सुरू होण्याची चिन्हे आहेत.
जुन्या शिवाजी पुलाचे आयुर्मान संपल्याने या पुलाची भारक्षमता किती आहे, हे तपासण्यासाठी बुधवारपासून पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला होता. त्यामुळे गेले दोन दिवस येथून सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि.च्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स एजन्सीच्या पथकाने हे काम सुरू केले आहे.
बुधवारी सकाळी स्ट्रक्चरल आॅडिटच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला. दोन दिवस हे काम चालले. दरम्यान शुक्रवारी रडारचा वापर करून पुलाची भारक्षमता चाचणी करण्यात येणार होती. परंतू त्याचे मापन करणारी यंत्रणाच न आल्याने शुक्रवारी नवीन पुलाचे आॅडिट सुरू करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच जुन्या पुलावरून अवजड वगळता सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली होती.
त्यामुळे या मार्गावरून कोल्हापुरात येणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुचाकी आणि चारचाकींची वाहतूक येथून सुरू होती. राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी दिवसभरातील कामकाजाचा संध्याकाळी आढावा घेतला.
जीपीआर टेस्ट शनिवारी
शनिवारी रडारचा वापर करून जीपीआर टेस्ट (पुलाची भारक्षमता चाचणी) करण्यात येणार आहे. त्यातून दगडातील ठिसूळपणा, दोन दगडांच्या जोडकामामध्ये यापूर्वी वापरलेले रसायन अथवा सिमेंट यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत ही चाचणी होणार असल्याने या कालावधीत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.