कोल्हापूर आयुक्तांची रात्रीही होती चाणाक्ष नजर, त्यांनी हेरले -पकडले आणि पुढे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:25 AM2020-04-24T11:25:49+5:302020-04-24T11:29:14+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कोल्हापूर शहरात होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कोल्हापूर शहरात होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्याबरोबरच आपली सर्व यंत्रणा कार्यक्षमपणे राबविली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या, भाजीविक्रेत्याच्या नाका-तोंडाला मास्क आहे की नाही हे सुद्धा आयुक्त जातीनिशी पाहत आहेत. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता काम आटोपून घरी जाताना वाटेत त्यांनी चार व्यक्तींना मास्क न लावल्याबद्दल चांगलेच हासडले शिवाय त्यांना प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड केला.
बुधवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडलेले आयुक्त कलशेट्टी ताराबाई पार्क येथील आपल्या निवासस्थानाकडे जात असताना वाटेत एक व्यक्ती मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसले. चालकाला गाडी थांबवायला सांगून त्या व्यक्तीला बोलावून घेतले. ‘मास्क का लावला नाही’ म्हणून विचारणा केली. त्याला काही उत्तर देता येईना. शेवटी १०० रुपये दंड भरायला भाग पाडले. त्याचवेळी अन्य तीन व्यक्तीसुद्धा मास्क न लावताच जात असताना त्यांनाही अडवून प्रत्येकी १०० रुपयांचा दंड केला.
पुढे एका स्वीटमार्टमध्ये विक्री सुरू असल्याचे त्यांना दिसले; परंतु तेथील दोन कर्मचाऱ्यांनी मास्क व हँडग्लोज घातलेले नव्हते. दुकानदारास आयुक्तांनी चांगलेच झापले. दोन कर्मचा-यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करून तो दुकानदाराकडून वसूल केला.
आयुक्त कलशेट्टी कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता अतिशय गंभीरपणे काम करत आहेत. नागरिकांनी घरात थांबावे, गरजेनुसारच बाहेर पडावे, मास्क, हँडग्लोज वापरावेत, सामाजिक अंतर राखावे अशा सूचना नागरिकांना, विक्रेत्यांना, दुकानदारांना ते वारंवार करत आहेत तरीही काही लोक बेफिकीरपणे वागत आहेत. दंडात्मक कारवाईबरोबरच आता त्यांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना दिले आहेत.