कोल्हापूर : शाहू समाधीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा : महापौर - उपमहापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:39 PM2019-01-03T16:39:32+5:302019-01-03T16:41:34+5:30
ज्यांच्या पुण्याईवर आज आपले जीवन सुखी- संपन्न झाले त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, असा आदेश महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी गुरुवारी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला. समाधीस्थळ परिसरात कराव्या लागणाऱ्या सुशोभिकरणाच्या कामास येत्या पंधरा दिवसात ७० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सुध्दा त्यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर : ज्यांच्या पुण्याईवर आज आपले जीवन सुखी- संपन्न झाले त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, असा आदेश महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी गुरुवारी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला. समाधीस्थळ परिसरात कराव्या लागणाऱ्या सुशोभिकरणाच्या कामास येत्या पंधरा दिवसात ७० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सुध्दा त्यांनी यावेळी दिली.
महापालिकेची विशेष सभा दि. ९ जानेवारी रोजी घेऊन आवश्यक ठराव मंजूर करुन दिले जातील. खर्चाची एस्टीमेट दोन दिवसात द्या. तुम्हाला जो निधी लागणार आहे तो तातडीने आम्ही उपलब्ध करुन देऊ. परंतु शाहू समाधीस्थळाच्या कामात यापुढे दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात उपमहापौर शेटे यांनी अधिकाऱ्यांना दम भरला. त्यामुळे अधिकारी देखील तातडीने समाधीस्थळावर जावून सुशोभिकरणाच्या कामाची पाहणी केली.
पूरेसा निधी असून देखील समाधीस्थळाचे काम काही महिने रेंगाळले आहे. त्यामुळे महापौर मोरे व उपमहापौर शेटे यांनी शुक्रवारी महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, शिल्पकार, आर्किटेक्टस् तसेच समितीचे सदस्य यांची एक संयुक्त बैठक गुरुवारी आयोजित केली होती.
सर्वच पदाधिकाऱ्यांनी काम रेंगाळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा पण काम थांबता नाही. शाहूंच्या पुण्याईवर आपण सगळे जगतो आहोत. त्यामुळे हा विषय आमच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा आहे, अशा शब्दात आपल्या भावना महापौर, उपमहापौर यांनी व्यक्त केल्या.
कंपौंड वॉलचे काम धीम्या गतीने सुरु असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच जादा कर्मचारी नियुक्त करुन ते तातडीने पूर्ण करा, कंपौड वॉलचे काम पूर्र करत असताना त्याच वेळी सुशोभिकरणाचे कामही हाती घेऊन पूर्ण करा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.