कोल्हापूर : शाहू समाधिस्थळ मेघडंबरीचे काम पूर्ण, जोडणीची चाचणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:10 PM2018-08-18T12:10:09+5:302018-08-18T12:11:15+5:30
सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा विलंब झाला; मात्र शिल्पकार किशोर पुरेकर यांनी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सर्व काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केला.
कोल्हापूर : सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा विलंब झाला; मात्र शिल्पकार किशोर पुरेकर यांनी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सर्व काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केला.
आपल्या अलौकिक कार्याद्वारे देशासमोर अनेक आदर्श मानदंड निर्माण करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी नर्सरी बागेत उभारण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत ही समाधी बांधली जात असून, माजी महापौर हसिना फरास व स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी त्यांच्या काळात पुढाकार घेऊन यासाठी निधी उपलब्ध करून दिला, तसेच काम पूर्णत्वाकडे जावे, यासाठी सतत आग्रह धरला होता.
फरास यांची महापौरपदाची कारकिर्द संपुष्टात आल्यानंतर हे काम आठ-नऊ महिने रेंगाळले. २५ जून रोजी झालेल्या शाहूजयंतीच्या निमित्ताने त्याची चर्चा झाल्यानंतर महापौर शोभा बोंद्रे यांनी या कामात लक्ष घातले. एवढेच नाही तर त्यांनी आयुक्तांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासमवेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिल्पकार किशोर पुरेकर यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला.
त्यांनी मेघडंबरीचे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करून द्या, अशी सक्त सूचना केली होती. रात्रंदिवस काम करा, काही अडचण असल्यास आमच्या कानांवर घाला, असेही त्यांनी बजावले होते. त्यानुसार पुरेकर यांनी काम आॅगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा शब्द दिला होता.
शिल्पकार पुरेकर यांनी हातातील सगळी कामे बाजूला ठेवून जादा कर्मचारी मदतीला घेत सुमारे दीड टन वजनाच्या ब्रॉँझमधील मेघडंबरीचे काम गुरुवारी पूर्ण केले. त्यांनी चारीही खांबांवर ही मेघडंबरी उभी केली. त्याकरिता त्यांना क्रेनचा वापर करावा लागला. चार खांबांवर उभी राहणारी ही मेघडंबरी इटली येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मारकाची हुबेहूब नक्कल आहे. ती ब्रॉँझची असल्याने मेघडंबरीला ऐतिहासिक बाज येण्याकरिता बरेच घासकाम करावे लागले. मेघडंबरी जोडणीची चाचणी यशस्वी झाल्याचे पुरेकर यांनी सांगितले. लवकरच प्रत्यक्ष जागेवर तिची जोडणी केली जाईल.
कंपौंड वॉलचे बांधकामही लवकरच सुरू
शाहू समाधिस्थळाभोवती मजबूत दगडी कुंपणाची भिंत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. समाधिस्थळाचे काम करणारे कंत्राटदार व्ही. के. पाटील यांनाच हे काम देण्यात आले आहे. सुमारे एक कोटी १० लाखांचे हे काम दगडी कोपिंग पद्धतीचे असेल. कंत्राटदारास वर्क आॅर्डर दिली असून, करारपत्र केल्यानंतर येत्या आठ दिवसांत हे कामही सुरू होईल, असे शहर उपअभियंता एस. के. माने यांनी सांगितले.