कोल्हापूर : शिवाजी पुलाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:51 PM2019-01-12T13:51:59+5:302019-01-12T13:58:46+5:30
कोल्हापूर येथील आयुर्मान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम रखडले जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे येथील अधिकारी व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे केली.
कोल्हापूर : येथील आयुर्मान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम रखडले जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे येथील अधिकारी व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे केली.
नवीन पुलाचे बांधकाम ठेकेदाराचे बिल न दिल्यामुळे थांबण्याची शक्यता असल्याने त्याबाबत जाब विचारण्याकरिता हे कार्यकर्ते व्ही. आर. कांडगावे यांच्या कार्यालयात सकाळी गेले होते. त्या ठिकाणी ठेकेदार एन. डी. लाड हेही उपस्थित होते.
शिवाजी पुलाचे बांधकाम ठेकेदाराची बिले दिली नाहीत म्हणून थांबता कामा नये. कोणत्या परवानगी मिळालेल्या नाहीत म्हणूनही काम थांबता कामा नये. जी काही पूर्तता करायची आहे, ती तातडीने करा; पण काम मात्र फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाले पाहिजे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी अधिकारी कांडगावे यांनी खुलासा करताना सांगितले की, ‘पुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा एका बाजूला विहीर होती. त्याकरिता पायलिंग करावे लागले. जादा खुदाई झाली. ती सिमेंट-कॉँक्रीटने भरून घेण्यात आली. त्यामुळे वाढीव कामाला संबंधित अधिकाऱ्यांची मंजुरी मिळणे आवश्यक असून, तिची प्रक्रि याही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र त्यामुळे काम थांबलेले नाही. काम सुरूच आहे. जास्तीत जास्त लवकर काम पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत; त्यामुळे उपलब्ध निधी आपल्याकडे वर्ग करून घ्या, अन्यथा निधीअभावी काम बंद पडले असे होईल, अशी भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तेव्हा मात्र कांडगावे यांनी पुलासाठी १५ कोटींचा निधी मंजूर आहे, त्यामुळे काम थांबणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, अशोक भंडारे, जयकु मार शिंदे, किसन कल्याणकर, सुभाष देसाई उपस्थित होते.