कोल्हापूर : घनकचरा प्रकल्प पूर्णत्वाकडे, मंगळवारी आयुक्तांकडे सुनावणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:57 AM2018-11-17T10:57:38+5:302018-11-17T11:03:30+5:30
लाईन बझार येथील घनकचरा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, अंतिम टप्प्यात काही अडचणी येत असतील, तर महापालिका संबंधित तांत्रिक कंपनींना रक्कम अदा करून, काम पूर्ण करून घेऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कोल्हापूर : लाईन बझार येथील घनकचरा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, अंतिम टप्प्यात काही अडचणी येत असतील, तर महापालिका संबंधित तांत्रिक कंपनींना रक्कम अदा करून, काम पूर्ण करून घेऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापनाचे काम पुणे येथील ‘रोकीम’ कंपनीला देण्यात आले आहे. हा २०० टनाचा प्रोजेक्ट बीओटीवर साकारला जात आहे. त्यांनी मशिनरीच्या जॉबवर्कचे काम दुसऱ्या कंपनीला दिलेले आहे. दोन कंपन्यांतील आर्थिक विषय आहे. सब ठेकेदारास पैसे न दिल्याने त्याने दोन मशिनरी नेल्या आहेत.
उर्वरित सर्व मशिनरी जाग्यावर आहेत. २० तारखेला आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. महापालिकेने कंपनीला कोणतेही पैसे अदा केले नाहीत; मात्र काम रेंगाळल्यामुळे ‘रोकीम’ला दंड सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
निकम पार्क कंपौड पाडण्याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करून कारवाई झालेली नाही. जुनी मोरी कॉलनी येथे सावर्डेकर यांनी अतिक्रमण केलेले आहे. रि. स. नं. ७२२/ ३ येथील लेआऊटची फाईन टी. पी.मधून गहाळ झालेली आहे. लेकव्ह्यु अपार्टमेंटच्या ठिकाणी बिल्डरकडून रस्ते व मार्जिन सोडण्यात आलेले नाही. जर येत्या गुरुवारपर्यंत प्रभागातील प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर टिपीला टाळे ठोकणार, असा इशारा दीपा मगदूम यांनी दिला.
निकमपार्क व नाल्याच्या बाजूच्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहे. त्यांचे उत्तर आलेले आहे. त्या ठिकाणी वैयक्तिक जागा असल्याने तेथील जागा भूसंपादन करावी लागणार आहे. संबंधित बिल्डरला नोटीस देण्यात आलेली आहे, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.
कचरा उठावाच्या टिपररिक्षा कधी सुरू करणार? अशी विचारणा सभापती आशिष ढवळे, प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. तेव्हा टिपर रिक्षासाठी ११ निविदा आलेल्या आहेत. त्याची छाननी सुरू आहे. लवकरच त्या खरेदी केल्या जातील, असे सांगण्यात आले.
रंकाळ्यामध्ये जैवविविधता धोक्यात येऊ नये म्हणून मासेमारीबाबत निर्णय घेण्यासाठी पर्यावरण विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.महापालिकेने ठेकेदारामार्फत जे चालक घेतलेले आहेत ते शिकाऊ आहेत. शिवाय त्यांना १४ हजार रुपये वेतन देतो. महापालिकेच्या मानधनावरील चालक १२ हजारमध्ये काम करतात. ठेकेदाराच्या चालकांना एवढे पैसे देऊन अपेक्षित रिझल्ट मिळत नाही, अशी तक्रार सभापती ढवळे यांनी यावेळी केली.