कोल्हापूर : प्राध्यापकांच्या ‘बेमुदत कामबंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:03 PM2018-09-25T16:03:50+5:302018-09-25T17:39:54+5:30
रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.
कोल्हापूर : रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरासह गडहिंग्लज, जयसिंगपूर, इचलकरंजी येथे प्राध्यापकांनी निदर्शने केली.
७१ दिवसांचा पगार मिळालाच पाहिजे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियमित वेतन मिळालेच पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी एम्फुक्टोने आंदोलन पुकारले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून बेमुदत कामबंद आंदोलन प्राध्यापकांनी मंगळवारपासून सुरू केले. त्यात सहभागी प्राध्यापकांनी शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयात बायोमेट्रीकअथवा मस्टरद्वारे हजेरी नोंदविली नाही.
शहरातील प्राध्यापक आणि सुटाचे पदाधिकारी सकाळी अकरा वाजता टाऊनहॉल बागेत जमले. याठिकाणी त्यांनी प्रलंबित मागण्याबाबत आणि सरकारच्या विरोधात ‘प्राध्यापकांना रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ ‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, अशा घोषणा देत त्यांनी निदर्शने केली.
यानंतर झालेल्या सभेत एम्फुक्टोचे उपाध्यक्ष सुभाष जाधव, सुटाचे मुख्य समन्वयक एस. जी. पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक सुधाकर मानकर, प्रमुख कार्यवाह डी. एन. पाटील, अध्यक्ष अरूण पाटील, डॉ. अरूण शिंदे, सयाजीराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एस. ए. बोजगर, अशोक कोरडे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, या आंदोलनाला पहिल्या दिवशी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांतील निम्मे प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले, तर उर्वरीत प्राध्यापकांनी महाविद्यालयातील कामकाज पाहिले. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी (सीएचबी) अनेक महाविद्यालयांतील कामकाज सांभाळले.
ज्या विषयांचे प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या विषयांचे अधिकत्तर महाविद्यालयांत तास झाले नाहीत. तास झाले नसल्याने ग्रंथालय, विद्यार्थी कक्षासह महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी थांबून होते. आंदोलनात ज्या महाविद्यालयांतील पूर्ण प्राध्यापक सहभागी झाले, तेथील शैक्षणिक कामकाज ठप्प झाले. आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ८० टक्के प्राध्यापक सहभागी
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ९० टक्के महाविद्यालयांतील ८० टक्के प्राध्यापक सहभागी झाले. शहरातील टाऊन हॉल आणि इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर येथे प्राध्यापकांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू राहील. मागण्यांबाबत सकारात्मक आणि ठोस निर्णय सरकारने घ्यावा. अन्यथा निदर्शने, मोर्चाद्वारे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले.