कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 03:35 PM2018-01-12T15:35:17+5:302018-01-12T15:45:51+5:30
समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर : समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहाजी महाविद्यालयातील या कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे मानद सचिव विजयराव बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ काटकर होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची ताकत वैचारिक साहित्यामध्ये आहे. आजच्या काळात वैचारिक साहित्य महत्वपूर्ण आहे. ते दुर्लक्षित होत आहे. डॉ. शिंदे म्हणाले, त्या-त्या काळाशी आणि सामाजिक प्रश्नांशी संबंधीत वैचारिक साहित्य असते. मराठी साहित्यातील कविता, गद्य, कादंबरी, नाटके यांच्याशी वैचारिक साहित्य संबंधीत होते.
आज व्हॉटस्अॅप, व्टिटर, फेसबुक आणि विविध माध्यमातून साहित्य निर्माण होत आहे. यास वैचारिक साहित्य म्हणावे का, हा प्रश्न पडतो. चांगल्या व निकोप समाज निमिर्तीसाठी वैचारिक साहित्याची आज नितांत गरज आहे.
प्रभारी प्राचार्य काटकर म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात प्रा. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. दीपककुमार वळवी यांनी स्वागत केले. विजय देठे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महादेव जाधव यांनी आभार मानले.
विचारवंतांचे मार्गदर्शन
उदघाटनानंतरच्या ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची गरज’ या विषयावर डॉ. ज. रा. दाभोळे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग पाटील होते. दुसऱ्या सत्रात डॉ. जयदेव डोळे यांचे ‘वृत्तपत्रातून गायब होत चाललेले वैचारिक गद्य' या विषयावर व्याख्यान झाले.
शिवाजी विद्यापीठाचे ओएसडी प्राचार्य डॉ. डी आर. मोरे अध्यक्षस्थानी होते. तिसऱ्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांचे ‘समकालीन मराठी वैचारिक लेखनातील गारठा’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कुंभार होते. चौथ्या सत्रात साठहून अधिक संशोधकानी शोधनिबंधाचे वाचन केले. पाचव्या सत्रात डॉ.अरूण शिंदे यांचे व्याख्यान झाले.