कोल्हापुरात कॉंग्रेसचे सर्वाधिक सभापती, सर्वपक्षीयही झाले यशस्वी
By admin | Published: March 14, 2017 06:51 PM2017-03-14T18:51:06+5:302017-03-14T18:51:06+5:30
गडहिंग्लजमध्ये चक्क राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र, चंदगड येथे भाजप, स्वाभिमानी आणि कॉंग्रेस एकत्र
कोल्हापुरात कॉंग्रेसचे सर्वाधिक सभापती, सर्वपक्षीयही झाले यशस्वी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सभापतीपदी सर्वपक्षीय उमेदवारांना संधी मिळाली असून कॉंग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन सभापती झाले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन ठिकाणी तर स्वाभिमानी, जनसुराज्य शक्ती आणि स्थानिक शाहू आघाडीला प्रत्येकी एका ठिकाणी सभापती बनवण्याची संधी मिळाली आहे.
गेल्या दोन दिवसात प्रचंड राजकीय उलथापालथी होत जिल्ह्यातील राजकारणामध्ये काहीही होवू शकते याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. गडहिंग्लजमध्ये चक्क राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली, तर दुसरीकडे भाजप, स्वाभिमानी आणि कॉंग्रेस एकत्र येत स्वाभिमानीचा केवळ एकच सदस्य असताना त्यालाच सभापती करण्याची राजकीय दानशूरताही चंदगड येथे दाखवण्यात आली आहे. कागलमध्ये माजी राजयमंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला घेतल्याने शिवसेनेच्या कमल पाटील या सभापती तर राष्ट्रवादीचे रमेश तोडकर बिनविरोध उपसभापती बनले. शिरोळमध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होऊन तेथे कॉंग्रेसचे मल्लाप्पा चौगुले यांची सभापतीपदी व उपसभापतीपदी शिवसेनेच्या कविता चौगुले यांची निवड झाली.
हातकणंगलेमध्ये भाजप ६, जनसुराज्य शक्ती ५ अशी ११ संख्या होती. काँग्रेसचे एकमेव सदस्य राजकुमार भोसले यांनी भाजप-जनसुराज्यशक्ती सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या रेश्मा सनदी यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी जनसुराज्यशक्तीच्या सुलोचना देशमुख यांची निवड करण्यात आली.
पन्हाळा येथे सभापतीपदी जनसुराज्यशक्तीचे पृथ्वीराज सरनोबत आणि उपसभापतीपदी उजवला पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राधानगरीचे सभापतिपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादीचे दिलीप कांबळे यांची येथे बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र उपसभापतीपदी मतदान होऊन येथे कॉंग्रेसचे रविशसिंह पाटील विजयी झाले. करवीरच्या सभापतिपदी काँग्रेसमधील सतेज पाटील गटाचे प्रदीप झांबरे यांची तर उपसभापतीपदी विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आजऱ्याच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रचना होलम यांची सभापतिपदी तर राष्ट्रवादीचेच शिरीष देसाई यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गडहिंग्लजमध्ये अनपेक्षितपणे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने भाजपच्या जयश्री तेली यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीच्या बानश्री चौगुले यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. भुदरगडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या शाहू आघाडीच्या सरिता करंडेकर व अजित देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चंदगडमध्ये मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या असून येथे स्वाभिमानीचे एकमेव सदस्य असलेले जगन्नाथ हुलजी हे सभापती झाले आहेत. तर भाजपचे अॅड. अनंत काबंळे उपसभापती बनले आहेत.
शाहूवाडी येथे शिवसेनेच्या स्नेहा जाधव व दिलीप पाटील यांची सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. गगनबावड्याच्या सभापती कॉंग्रेसच्या मंगल कांबळे तर उपसभापती कॉंग्रेसचेच पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.