कऱ्हाडमधील गुन्हेगारांचे कोल्हापूर कनेकशन: पोलिसांकडून शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:25 PM2018-12-20T14:25:35+5:302018-12-20T14:28:27+5:30
सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
कोल्हापूर : सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
जवाहरनगरातील स्वयंघोषित ‘डॉन’ समजणारा सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसह जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर बुधवारी दिवसभर थांबून होता. तो पोलीस आणि इतर गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला दोन दिवस चौकशीसाठी ठेवून घेतले होते.
नुकताच कारागृहातून तो बाहेर पडला आहे. गुन्हेगारी साम्राज्यामध्ये आपली छबी निर्माण करण्यासाठी त्याची उठाठेव सुरू आहे. त्यासाठी त्याने काही पोलिसांनाही हाताशी धरले असल्याची चर्चा आहे. फलटण-कऱ्हाड येथील गुन्हेगारांशी त्याचे काय कनेक्शन आहे, याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.
दरम्यान, कऱ्हाड येथील टोळीच्या गराड्यातून पसार झालेले तिघे संशयित हे कोल्हापुरातील कुप्रसिद्ध टोळीचे म्होरके असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांच्यावरही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ते फोन बंद करून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या गुंडांच्या मदतीसाठी दिवसभर सातारा, कऱ्हाड सह कोल्हापुरातील काही गुंड जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर तळ ठोकून होते.
कळंबा ते पाचगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने संशयित किरण गुलाब गावित ( रा. सैदापूर, विद्यानगर, कऱ्हाड , जि. सातारा), श्रीकांत ऊर्फ गोट्या चंद्रकांत कदम (रा. कॉलेज रोड, शुक्रवार पेठ, फलटण, जि. सातारा), चेतन शिवाजी कांबळे , संदीप शिवाजी कांबळे (दोघे रा. शारदानगर, काळकी, शिवतेज निवास, ता. फलटण, जि. सातारा), शिवराज सुरेश इंगवले (रा. लाहोटीनगर, मलकापूर, कऱ्हाड, जि. सातारा), नितीन गणपत शिर्के (रा. नांदलापूर, ता. कऱ्हाड , जि. सातारा) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यात दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांतील एक कार संदीप कांबळे याच्या पत्नीच्या नावावर आहे. तर दुसरी शिर्के याच्या मित्राची आहे.
या टोळीला सातारा येथील राजकीय वलय आहे. त्यांना अटक झाल्याचे समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बड्या लोकप्रतिनिधींचे फोन झाले; परंतू पोलिसांचा गुन्'ांचे गांभीर्य लक्षात घेत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संशयित किरण गावित हा टोळीचा म्होरक्या आहे. त्याने वाळूमाफियांच्या वादातून सल्यावर न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडल्या होत्या. त्यापासून कऱ्हाड येथील एक सक्रिय टोळी त्याचा गेम करण्याच्या मागावर आहे. त्यातून आपला बचाव व्हावा, यासाठी त्याची कट-कारस्थाने सुरू आहेत.
त्याचा कोल्हापुरातील गुन्हेगारी टोळ्यांशी हातमिळवणी करण्याचा उद्देश असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. जवाहरनगर परिसरातील ‘डॉन’ची दिवसभरातील पोलीस ठाण्याच्या आवारातील घालमेल पाहून त्याचा या टोळीशी काही संबंध आहे काय, याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.
टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता
कऱ्हाड येथील किरण गावित याच्यासह साथीदारांकडे मिळून आलेली पिस्तुले ही राजस्थानामधून खरेदी केल्याचे पुढे आले आहे. कोल्हापुरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांशी त्यांची बैठक होणार होती. त्यामध्ये ‘गेम’ हाच प्लॅन त्यांचा होता. ते सुपारी घेऊन कोणाची गेम करणार होते काय, या दृष्टीनेही पोलीस चौकशी करीत आहेत.
गावित कोल्हापुरात आल्याची टिप एका गुन्हेगारी टोळीनेच दिली आहे. त्यामुळे भविष्यात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे.