सांगली पेपरफुटीचे ‘कोल्हापूर कनेक्शन’

By admin | Published: January 22, 2016 01:08 AM2016-01-22T01:08:06+5:302016-01-22T01:11:02+5:30

चौघे निलंबित : दोन ग्रामसेवकांचा समावेश

'Kolhapur connection' of Sangli Paperfuti | सांगली पेपरफुटीचे ‘कोल्हापूर कनेक्शन’

सांगली पेपरफुटीचे ‘कोल्हापूर कनेक्शन’

Next

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर दोन महिन्यांपूर्वी सांगली जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटीच्या प्रकरणातील टोळीचे कनेक्शन कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेपर्यंत असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात सांगली पोलिसांनी अटक केलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दोन ग्रामसेवकांसह चौघांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी निलंबित केले. ग्रामसेवक अशोक शामराव माने, शिवाजी पांडुरंग गायकवाड, अध्यापक (शिक्षक) बबन विठ्ठल पाटील, लिपिक शशांक श्रीकांत जाधव अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, पेपरफुटीच्या प्रकरणातील टोळीत या चौघांची भूमिका काय होती, कसा संबंध आहे, यासंबंधी तपास सुरू आहे; परंतु, चौघांना अटक होऊन पोलीस कोठडी मिळाल्यामुळे सीईओ सुभेदार यांनी कारवाई केली आहे. एकाचवेळी चौघांना निलंबनाचा दणका बसल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निलंबित झालेले ग्रामसेवक माने डोणोली (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीकडे कार्यरत होते. निलंबन कालावधीत त्यांना भुदरगड पंचायत समितीच्या कार्यालयात काम करण्याचा आदेश आहे. ग्रामसेवक गायकवाड राधानगरी तालुक्यातील तळाशी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते. त्यांना निलंबन कालावधीत गडहिंग्लज पंचायत समितीच्या कार्यालयात काम करण्याचे आदेश दिले आहेत.
बबन पाटील विद्यामंदिर घोटवडे (ता. राधानगरी) अध्यापक म्हणून काम करत होते. पाटील यांना निलंबन कालावधीत शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयात काम करण्याचा आदेश आहे. जाधव कनिष्ठ सहायक पदावर हातकणंगले पंचायत समितीमध्ये काम करत होते. निलंबन कालावधीत आजरा पंचायत समितीमध्ये त्यांना काम करण्याचा आदेश आहे. त्यातील ग्रामसेवक माने, गायकवाड, लिपिक जाधव दि. २४ ते २९ डिसेंबर २०१५ अखेर तर अध्यापक पाटील दि. ८ ते १२ जानेवारीअखेर पोलीस कोठडीत होते. त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील कार्यालयातील कर्मचारी निलंबनानंतर चौघांच्या ‘कारनाम्या’ची दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. सांगलीत झालेल्या विविध पदांच्या भरतीचे पेपर छपाई तेथील जिल्हा परिषदेच्या प्रिंटिग पे्रसमध्ये करण्यात आले होते.
जिल्ह्यातील चौघेजण सांगली जिल्ह्यातील पेपर फोडणाऱ्या टोळीत कसे सहभागी झाले, हे अद्याप पोलिसांनी अधिकृतपणे सांगितलेले नाही. या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. आतापर्यंत सांगली जिल्हा परिषदेचे सहा आणि निलंबित झालेले चौघे असे दहा जणांना डिसेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. आणखी बारा जण सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या चौघांचा त्या प्रकरणातील ‘रोल’ स्पष्ट होणार आहे.
सांगलीसह राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया नोव्हेंबर २०१५ मध्ये राबविण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेवेळी आरोग्यसेविका आणि औषध निर्माता पदासाठीचा पेपर फुटला. परिणामी हे भरती प्रकरण राज्यात गाजत आहे. पोलीस तपासात या प्रकरणात टोळीच कार्यरत असल्याचे पुढे येत आहे. पेपरफुटीची पाळेमुळे दोन जिल्'ांत पसरल्याचे उघड आहे.


पेपर फुटीप्रकरणी
एसटी वाहकास अटक
सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पदाच्या पेपर फुटीप्रकरणी म्हाळुंगे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील संग्राम रामचंद्र पोवार (वय ३१) यास शहर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. तो कागल (जि. कोल्हापूर) येथील एसटी आगारात वाहक आहे. न्यायालयाने त्यास २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन महिन्यांपूर्वी हे पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. आतापर्यंत दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकारीही आहेत. मुख्य संशयित रामदास फुलारे हा आहे. तो जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयात वरिष्ठ बार्इंडर या पदावर नियुक्तीस आहे. त्यानेच प्रश्नपत्रिका बाहेर काढली होती. यातील संशयित शिवाजी गायकवाड व संजय पोवार या दोघांची ओळख होती. पोवारने त्याला एक उमेदवार आणून दिला होता. या उमेदवारास त्यांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देऊन लाखो रुपये घेतल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी पोवारला बुधवारी रात्री अटक केली.


कोल्हापूर जिल्हा परिषदेला ‘डाग’...
राज्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नावलौकिक असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडली; परंतु, सांगली जिल्हा परिषदेच्या भरतीमधील पेपरफुटीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सांगलीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेलाही अप्रत्यक्षरीत्या ‘डाग’ लागला आहे.


१९ संशयितांवर गुन्हा
आरोग्य सेविका व औषध निर्माण अधिकारी या दोन पदांच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत १९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नऊ संशयित न्यायालयातून जामीन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संशयितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Kolhapur connection' of Sangli Paperfuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.