कोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:53 PM2018-12-08T15:53:20+5:302018-12-08T15:55:16+5:30
जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी येथे केले.
कोल्हापूर : जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील ‘मटेरिअल्स व एन्व्हायर्नमेंट सायन्सेस’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अ
ध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र आणि युसिक विभाग, श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय (सोळांकूर), न्यू कॉलेज (कोल्हापूर) यांच्यातर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
प्रा. ख्रिस्तोफर म्हणाले, मानवी अस्तित्वासाठी पर्यावरणपूरक संशोधन करणे ही जागतिक संशोधन समुदायासमोरची प्राथमिकता असायला हवी. आंतरविद्याशाखीय, बहुशाखीय संशोधन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विज्ञानाच्या सर्वच शाखांमधील संशोधकांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सोळांकूर महाविद्यालयाचे संस्थापक ए. वाय. पाटील, अध्यक्ष आर. वाय. पाटील, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, सोळांकूरचे प्राचार्य डॉ. जी. जी. चौगुले, डॉ. आर. बी. पाटील, उपस्थित होते. डॉ. आर. के. कामत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आभार मानले. या परिषदेत कॅनडासह आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, तैवान, श्रीलंका, सौदी अरेबिया, आदी देशांतील संशोधक सहभागी आहेत.
धोरण ठरवून संशोधन व्हावे
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, संशोधकांनी सुरक्षित, स्वस्त, वापरण्यास सुलभ अशा प्रकारचे तंत्रज्ञान, उत्पादने निर्माण करण्याचे धोरण ठरवून त्या दिशेने संशोधन करण्याची आज गरज आहे.