कोल्हापूर : सतत गैरहजर, आरोग्य निरीक्षकांसह ७ कामगारांवर बडतर्फीची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 06:09 PM2018-03-22T18:09:16+5:302018-03-22T18:09:16+5:30
आरोग्य विभागातील सतत गैरहजर राहणाऱ्या झाडू कामगारांवर कडक कारवाईचे धोरण प्रशासनाने स्वीकारले असून १२७ कामगारांच्या कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सात कामगारांसह एका कामगाराकडून अर्धा पगार घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत ही माहिती देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
कोल्हापूर : आरोग्य विभागातील सतत गैरहजर राहणाऱ्या झाडू कामगारांवर कडक कारवाईचे धोरण प्रशासनाने स्वीकारले असून १२७ कामगारांच्या कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सात कामगारांसह एका कामगाराकडून अर्धा पगार घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत ही माहिती देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
आरोग्य निरीक्षक अमर कांबळे यांनी झाडू कामगार प्रियांका कांबळे रजेवर असताना तिची हजेरी भरून त्याबदल्यात अर्धा पगार घेतला होता याबाबत आयुक्तांपर्यंत तक्रार गेली होती. त्या आरोग्य निरीक्षकावर काय कारवाई केली, अशी विचारणा प्रतीक्षा पाटील व राहुल माने यांनी सभेत केली. त्यावेळी प्रशासनाने माहिती देताना सांगितले की, संबंधित कामगारास नोटीस दिली आहे.
अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. आरोग्य निरीक्षक अमर कांबळे यास कमी करण्याचे आयुक्तांचे आदेश प्राप्त झाले आहेत. गैरहजर राहणाऱ्या १२६ कामगारांच्या कामस्वरूपी वेतनवाढी थोपवल्या आहेत. ४६ कामगारांची चौकशी सुरू आहे. २२ कामगार दोषी आहेत. ७ कामगारांना बडतर्फ करण्यासाठी व इतर कर्मचारी मूळ पदावर घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
जनता बाझार ते लॉ कॉलेज रस्ता वॉरंटीची मुदत संपण्यापूर्वीच पावसात वाहून गेला. रस्ता पुन्हा करून घ्या, अशी मागणी संजय मोहिते, प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. खराब रस्त्यांच्याबाबत सर्व विभागीय कार्यालयांना अहवाल द्यायला सांगितले आहे. गेल्यावेळी २७ रस्ते पुन्हा करून घेतले आहेत. २० एप्रिलपर्यंत अशा रस्त्यांची कामे करून घेऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील खुल्या जागांना महापालिकेचे नाव लागले का, अशी विचारणा राहुल माने यांनी केली तेव्हा १८८ पैकी ५३ जागांना नाव लागले आहे. यातील इनामी जमिन व इतर कारणाने नाव लावण्याची कामे प्रलंबित आहेत, अशी माहिती देण्यात आली. देवकर पाणंद येथील स्ट्रॉम वॉटर कामाचा प्रश्न दीपा मगदूम यांनी उपस्थित केला. शासनाने स्ट्रॉम वॉटरचा निधी परत मागितला आहे हे खरे आहे काय? अशी विचारणाही त्यांनी केली.
शासनाने सदरचा प्रकल्प बंद करून पैसे जमा करण्यासाठी कळविले आहे. शासनास पत्रव्यवहार करून पैसे थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात ४० ठिकाणी गळती असून सर्व्हेनुसार ७ ते ८ एमएलडी पाणी वाया जाते, अशी माहिती गीता गुरव यांच्या प्रश्नावर देण्यात आली.
निवृत्त कामगारांचे महापालिकेच्या घरात वास्तव्य
कामगार चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून भाडे पगारातून कपात होत नाही. १७ ते १८ वर्षे कामगाार तसेच राहत आहेत याकडे कविता माने यांनी लक्ष वेधले. त्यावर खुलासा करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात महापालिकेच्या ९ चाळी आहेत. डाटा संकलन केला आहे. काही कर्मचारी निवृत्त झालेत परंतु वारसदार राहतात. त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे.