कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरच्या नुतन वास्तूसाठी हवे सहकार्य : जाधव, प्रिन्स शिवाजी हॉलचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 06:48 PM2017-12-28T18:48:27+5:302017-12-28T18:54:48+5:30
करवीर नगर वाचन मंदिरच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या वास्तूचे भूमिपूजन गुरूवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव यांनी करवीर नगर वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र असून येथे नव्या सोयीसुविधांनी साकारण्यात येत असलेल्या वास्तूसाठी सर्वांचे सहकाये अपेक्षित आहे असे आवाहन केले.
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या वास्तूचे भूमिपूजन गुरूवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव यांनी करवीर नगर वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र असून येथे नव्या सोयीसुविधांनी साकारण्यात येत असलेल्या वास्तूसाठी सर्वांचे सहकाये अपेक्षित आहे असे आवाहन केले.
शतकोत्तर हीरकमहोत्सव साजरा करत असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाला फार मोठी परंपरा व वाचन संस्कृती चळवळीचा वारसा लाभला आहे. संस्थेच्या मुख्य इमारतीशेजारी असलेला प्रिन्स शिवाजी हॉल ही वास्तू २०१२ च्या दरम्यान नुतनीकरणाच्यानिमित्ताने पाडण्यात आली. मात्र हॉलवरून झालेल्या आंदोलनानंतर हे काम गेली पाच सहा वर्षे थांबले होते.
काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने संस्थेला बांधकाम परवाना दिल्याने आता मात्र वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने ही इमारत बांधण्यात येणार असून त्याचे प्रथमदर्शनी रुप हे जुन्या प्रिन्स शिवाजी हॉलप्रमाणेच असणार आहे.
हेरिटेज समितीचे सदस्य उदय गायकवाड म्हणाले, लोकभावनेचा आदर करत मुळ इमारतीचा ढाचा कायम राखत नवी वास्तू येथे उभारण्यात येणार आहे. कार्यवाह सतिश कुलकर्णी यांनी नुतन वास्तूत आर्ट गॅलरी, अभ्यासिका, तसेच हॅलो कनवा नावाचे रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार आहे. तरी दानशूर व्यक्तींनी वास्तूसाठी निधी द्यावा असे आवाहन केले.
नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत भोसले यांनी आभार मानले. यावेळी दुर्ग अभ्यासक प्रमोद पाटील, बजरंग दलाचे बंडा साळोखे, नगरसेवक अजित ठाणेकर, देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा, डॉ. उदय कुलकर्णी, महेश धर्माधिकारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, उपकार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळोखे, सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर, संचाल्रत अनिल वेल्हाळ, उदय सांगवडेकर, गुरुदत्त म्हाडगुत, अॅड. केदार मुनिश्वर, प्रशांत वेल्हाळ, नंदकुमार दिवटे, माधव मुनिश्वर, डॉ. संजीवनी तोफखाने, मनिषा वाडीकर यांच्यासह संस्थेचे सभासद व मान्यवर उपस्थित होते.