कोल्हापूर :  मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा : पुष्पा भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:54 PM2018-01-02T18:54:14+5:302018-01-02T18:58:27+5:30

मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंगळवारी येथे केले.

Kolhapur: The core of the functioning of Maharshi Shinde in human centric thought process: Pushpa Bhave | कोल्हापूर :  मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा : पुष्पा भावे

शिवाजी विद्यापीठात मंगळवारी रा. ना. चव्हाणलिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन, भाग-दोन’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून राजन गवस, एन. डी. पाटील, रमेश चव्हाण, डी. टी. शिर्के, सुजाता पवार, गो. मा. पवार, अशोक शिंदे, रणधीर शिंदे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात महर्षी वि. रा. शिंदे: एक दर्शन- भाग दोन ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंगळवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रा. ना. चव्हाणलिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन, भाग-दोन’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रा. भावे म्हणाल्या, महर्षी शिंदे यांचे कार्य आणि विचार आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना देशामध्ये जे सामाजिक बदल अभिप्रेत होते, त्या दिशेने त्यांनी काम केले. ते आपल्या उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने कार्यरत राहिले. लोकांना एकत्र करून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची भूमिका असते. अशा सुसंवादातून ते बदल घडवू पाहत होते.

महर्षींची ही पद्धत आपण अंगीकारणे अत्यावश्यक आहे. कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, विचारांची स्पष्टता, निर्मळ सहृदयता या गुणांसह मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी महर्षी शिंदे यांनी कार्य केले. त्यांच्याविषयीच्या ग्रंथातून समाज इतिहासाचा एक आदर्श वस्तुपाठ प्रदर्शित झाला आहे.

प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अध्यासनातर्फे पुढील वर्षभर महर्षींचे विचार व कार्य याविषयी विविध उपक्रमांचे नियोजन करावे. त्यांच्या ७५व्या स्मृतिदिनी वाईमध्येही एखादे चिंतन शिबिर घेण्याचा विचार करावा. या कार्यक्रमात डॉ. गो. मा. पवार, ग्रंथाचे संपादक रमेश चव्हाण, महर्षींचे नातू निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, महर्षी शिंदे यांच्या नात सुजाता पवार, पणतू राहुल पवार, आनंद भावे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, व्यंकाप्पा भोसले, अरुण शिंदे, रमेश शिपूरकर, टी. एस. पाटील, रमेश कोलवालकर, आदी उपस्थित होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य

महर्षी शिंदे यांनी अन्य कोणत्याही बाबीपेक्षा नेहमी विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य दिले. त्यांचा प्रवास हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणी अथवा धर्मानुसार नव्हे, तर त्यांनी स्वत: ठरविलेल्या तत्त्वांनुसार झाला असल्याचे प्रा. भावे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Kolhapur: The core of the functioning of Maharshi Shinde in human centric thought process: Pushpa Bhave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.