कोल्हापूर महापालिकेचा उपक्रम , ८५ दिव्यांगांना प्रत्येकी २५ हजार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:28 AM2019-06-05T11:28:05+5:302019-06-05T11:30:26+5:30
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ८५ दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ८५ दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
महापालिका प्रशासनाने सन २०१५ मध्ये १७३ दिव्यांग बांधवांना केबिन वाटप केले होती. उर्वरित १४० दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित होते. त्यांपैकी सहा दिव्यांग अपात्र झाले होते. त्यामुळे १२९ दिव्यांगांना केबिनऐवजी २५ हजार रुपयांची रक्कम द्यायचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत मंगळवारी महापौर मोरे व आयुक्त कलशेट्टी यांच्या हस्ते ८५ दिव्यांगांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले.
महापालिकेने वार्षिक अंदाजपत्रकामध्ये शहरातील दिव्यांग बांधवांकरिता विशेष निधीची तरतूद केलेली असून, या तरतुदीअंतर्गत शहर परिसरातील पात्र लाभार्थ्यांना उपजीविका व उदरनिर्वाहासाठी यापूर्वी केबिनचे वाटप करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पात्र ठरलेल्या उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच ‘आरटीजीएस’द्वारा अनुदान प्रदान करण्यात येईल, असे महापौर मोरे यांनी सांगितले. यावेळी आयुक्तांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी महापालिकेने दिव्यांगांना वेळोवेळी टप्प्याटप्प्याने मदत केली असल्याचे सांगितले. उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.यू.एल.एम.च्या विजय तळेकर, निवास कोळी, रोहित सोनुले, स्वाती शहा, अंजली सौंदलगेकर यांनी दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दिव्यांग बांधवांच्या कागदपत्रांची पडताळणी केली.
यावेळी शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर, नगरसेवक ईश्वर परमार, उपायुक्त मंगेश शिदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे उपस्थित होते.