कोल्हापूर : कोथिंबीर कडाडली : ३० रुपये पेंढी, फळबाजारात स्ट्रॉबेरीची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:31 PM2019-01-07T12:31:31+5:302019-01-07T12:42:50+5:30
गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून, कोथिंबीर चांगलीच कडाडली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर ३० रुपये झाला आहे. फळबाजारात विविध फळांसह स्ट्रॉबेरीची रेलचेल आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपये झाला आहे. डाळी व कडधान्यांचे दर स्थिर असून खोबरे व खोबरेल तेलाच्या दरांत वाढ झालेली आहे.
कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून, कोथिंबीर चांगलीच कडाडली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर ३० रुपये झाला आहे. फळबाजारात विविध फळांसह स्ट्रॉबेरीची रेलचेल आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपये झाला आहे. डाळी व कडधान्यांचे दर स्थिर असून खोबरे व खोबरेल तेलाच्या दरांत वाढ झालेली आहे.
स्थानिक भाजीपाल्याची आवक जोरात आहे. आवक वाढली असली तरी भाजीपाल्याचा त्या प्रमाणात उठावही होत असल्याने दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात प्रमुख भाज्यांच्या दरांत सरासरी पाच ते सहा रुपयांची वाढ झालेली दिसते. पाच रुपये किलोपर्यंत असणारा कोबी या आठवड्यात आठ रुपये ५० पैसे झाला आहे. वांग्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून ढबू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडका या प्रमुख भाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. सरासरी १५ रुपयांपर्यंत असणारा टोमॅटो रविवारी रुपयांपर्यंत पोहोचला.
कोथिंबिरीची आवक एकदम कमी झाली आहे. मध्यंतरीच्या थंडीमुळे कोथिंबिरीच्या पिकाला फटका बसल्याने आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोथिंबिरीची रोज ११ हजार पेंढ्याची आवक सुरू आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात सरासरी आठ रुपये असणारी पेंढी या आठवड्यात मात्र २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. किरकोळ बाजारात ३० रुपये पेंढी दर झाला. हरभरा पेंढीसह मेथी, पालक, पोकळा, चाकवताचे दर स्थिर आहेत.
फळबाजारामध्ये मोसंबी, माल्टा, संत्री या फळांची आवक चांगली आहे. पिवळ्याधमक संत्र्यांनी बाजार फुलला असून, दर सरासरी ४० रुपयांपर्यंत राहिला आहे. डाळींब, बोरे, स्ट्रॉबेरीची रेलचेल सुरू आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपयांपर्यंत आहे. सफरचंद, कलिंगडे, चिक्कूची आवक स्थिर असून बोरांची आवकही बऱ्यापैकी टिकून आहे.
तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही. सरकी तेल ८० रुपये, तर साखर ३४ रुपयांवर स्थिर राहिली आहे. ज्वारीच्या दरात थोडी वाढ सुरू असून किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे. खोबरे व खोबरेल तेलाच्या दरात थोडी वाढ झालेली आहे.
कांदा-बटाटा स्थिर
कांदा व बटाट्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी सहा रुपये तर बटाटा १० रुपये दर राहिला आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गूळ तेजीत
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या मागणीत थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गुळाचा दर सरासरी ३५०० रुपये क्विंटल राहिला असून, दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.