कोल्हापुरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगावप्रकरणी बंदला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:57 PM2018-01-03T14:57:19+5:302018-01-03T16:05:00+5:30
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल विरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे.
कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल विरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे.
कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असला तरी अनेक ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहेत. महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी कार्यकर्तेही समर्थनार्थ उतरले असून त्यांनीही रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केली आहे. गुजरीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले. तथापि आंदोलकांचा संताप अनावर झालेला होता.
ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड सुरु आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या असून पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शहरातील सिध्दार्थनगर परिसरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते घुसले असून तेथे तोडफोड सुरु केली आहे. सिध्दार्थनगर, शनिवार पेठ, व्हीनस कॉर्नर येथे जमाव हिंसक झाला आहे. कोल्हापूरात स्टेशन रोडवरील बंद असलेल्या टपऱ्याही फोडण्यात आल्या. दसरा चौकात थांबविण्यात आलेल्या कोल्हापूर शहर बससेवेच्या बसेस फोडण्यात आल्या आहेत.
पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्याही जमावाने सोडल्या नाहीत. दसरा चौकातील दैनिक तरुण भारतच्या कार्यालयावरही राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आलेल्या जमावाने अचानकपणे दगडफेक केल्यामुळे वातारवणात तणाव निर्माण झाला. जमाव या दैनिकाच्या कार्यालयातही घुसला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जमाव मागे फिरला.
शाहूपुरीत एका हल्लेखोर भीमसैनिकाची गाडी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पेटवून दिली. गाड्या फोडणाऱ्या चार ते पाच हल्लेखोरांना काही जणांच्या गटाने बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यातील एकजण अत्यवस्थ आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चा काढत शहरातून दुचाकी रॅली काढली. शाहुपुरीतील गाडी पेटविण्याचे लोण शहरभर पसरले. गोकुळ हॉटेलच्या मागे लावलेली एक दुचाकी जमावाने पेटविली.
शाहुपुरीनंतर राजारामपुरी तसेच दसरा चौक, महाद्वार रोड, बिंदू चौकात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ५0 हून अधिक दुचाकी तसेच चारचाकी गाड्या जमावाने फोडून त्यांचा चक्काचूर केला. कोल्हापूरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, रवि इंगवलेही रस्त्यावर उतरले असून ते शांततेचे आवाहन करत आहेत.